Budget 2024 Halwa Ceremony: केंद्रातील मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. तत्पुर्वी देशाच्या अंतरिम बजेट 2024 ची तयारी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीतील रायसीना हिल्सवरील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या अर्थ मंत्रालयात हलवा समारंभाच्या आयोजनाने याची सुरुवात झाली असून, 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थ मंत्रालयाच्या 100 हून अधिक कर्मचार्यांना मंत्रालयात लॉक करण्यात येणार आहे. बजेट सादर झाल्यानंतरच त्या सर्वांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.
निर्मला सीतारामण यांनी स्वतःच्या हाताने हलवा वाटला
दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. हलवा समारंभात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि अर्थ मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या हाताने उपस्थित सर्व लोकांना हलवा वाटला. या समारंभामागील श्रद्धा अशी आहे की, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खावे. भारतीय परंपरेत हलवा अत्यंत शुभ मानला जातो, यामुळेच अर्थसंकल्पीय दस्तऐवजाच्या छपाईपूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो.
👉 Final stage of preparations for #InterimUnionBudget2024 commences with #HalwaCeremony2024 in presence of Union Finance Minister Smt. @nsitharaman, Union Minister of State for Finance Dr. @DrBhagwatKarad.
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 24, 2024
👉 Like the previous three full Union Budgets, Interim Union Budget 2024… pic.twitter.com/8vo1Zi2juK
अंतरिम बजेट पेपरलेस असेल
गेल्या तीन वर्षांच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 देखील पेपरलेस असेल. हा येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर केला जाईल. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, वार्षिक आर्थिक विवरण, अनुदानाची मागणी आणि वित्त विधेयकासह सर्व अर्थसंकल्पीय दस्तऐवज केंद्रीय बजेट मोबाइल अॅपमध्ये असतील. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर ते Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 'Union Budget Mobile App' वर उपलब्ध होईल.
100 हून अधिक कर्मचाऱ्यांचा अर्थमंत्रालयात मुक्काम
अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर आणि अर्थमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे अर्थ मंत्रालयाच्या तळघरात असलेल्या मुद्रणालयात पाठवली जातात. बजेट दस्तऐवज अत्यंत गोपनीय मानले जातात, त्यामुळे बजेट सादर होईपर्यंत अर्थ मंत्रालयाचे 100 हून अधिक कर्मचारी अर्थ मंत्रालयातच मुक्काम करतात. त्यांची राहण्याची आणि खाण्याची सर्व सोय इथेच केलेली असते.