Join us  

Budget 2024: अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी कशी झाली? यापूर्वी होती 'ही' तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 9:44 AM

दरवर्षी प्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.

दरवर्षी प्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. अनेक वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर केला जात आहे. परंतु यापूर्वी अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी (किंवा लीप वर्षांमध्ये २९ फेब्रुवारी) रोजी सादर केला जात होता. ही तारीख का आणि केव्हा बदलली? वास्तविक, २०१७ मध्ये ही परंपरा बदलण्यात आली. तेव्हा अरुण जेटली अर्थमंत्री होते. कोरोना महासाथीच्या काळातही ही प्रथा सुरू राहिली आणि १ फेब्रुवारीला २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी, सरकार आर्थिक सर्वेक्षण सादर करते, जे देशाच्या आर्थिक स्थितीवर एक रिपोर्ट कार्ड असते आणि अर्थसंकल्पाची रूपरेषा तयार करते. पारंपारिकपणे दोन भागात होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्प सादर केला जातो. पहिला भाग साधारणपणे ३१ जानेवारीला सुरू होतो.तारीख का बदलली?तारीख बदलल्यानं १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या आगामी आर्थिक वर्षासाठी नवीन धोरणं आणि बदलांची तयारी करण्यास अधिक वेळ मिळेल. फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या नेहमीच्या पद्धतीमुळे संपूर्ण प्रक्रियेत विलंब झाला कारण तो प्रत्यक्षात नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपेक्षा खूप उशीरा पारित झाला, असा युक्तीवाद तेव्हा सरकारनं केला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, तारखेतील बदलाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं ती फेटाळली.काय म्हटलेलं याचिकेत ?वृत्तानुसार, याचिकाकर्त्यांच्या वकिलानं असा युक्तिवाद केला की केंद्र खर्चाची आश्वासनं देऊन निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकते. परंतु न्यायालयानं म्हटले की केंद्रीय अर्थसंकल्पाचा राज्यांशी काहीही संबंध नाही आणि यावर जोर दिला की राज्यांमध्ये निवडणुका इतक्या वारंवार होतात की ते केंद्राच्या कामात अडथळाही आणू शकत नाहीत. १९९९ पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सादर केला जात होता, ही प्रथा ब्रिटिश काळापासून चालत आली होती. १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्पाची वेळ बदलली आणि तो ११ वाजता सादर केला जाऊ लागला.

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामन