लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले. या चार जाती दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी ह्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चार जातींचा उल्लेख केला होता. तसेच आपलं लक्ष या चार जातींवर असल्याचे सांगितले होते.
गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या विकासाचा उल्लेख करताना वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, सर्वांसाठी घर, प्रत्येक घरामध्ये पाणी आणि सर्वांसाठी वीज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ८० कोटी लोकांसाठी मोफत धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. सर्व पात्र लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर काम सुरू आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, गरीब, महिला, तरुम आणि शेतकऱ्यांवर आमचं सरकार सर्वाधिक लक्ष देत आहे. त्यांचं जीवन सुधारण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. गरीब कल्याणामध्येच देशाचं कल्याण आहे. आम्ही गरीबांसाठी खूप काम करत आहोत. या १० वर्षांमध्ये सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
यावेळी संसदेत वित्तमंत्र्यांनी सांगितले की, पीएम पीकविमा योजनेच्या माध्यमातून ४ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काम करत आहेत. २०१४ पूर्वी देशासमोर अनेक समस्या होत्या. मागच्या १० वर्षांमध्ये ३० कोटी मुद्रा योजना कर्ज महिला व्यावसायिकांना देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवाज योजनेच्या माध्यमातून महिलांना ७० टक्के घरं देण्यात आली आहेत.