Join us

Budget 2024: ‘यूपीए’च्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 7:06 AM

Budget 2024: यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. ही श्वेतपत्रिका पुढच्याच आठवड्यात मांडण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली  - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान म्हणजेच तात्पुरता अर्थसंकल्प सादर केला. ताे मांडताना त्यांनी माेदी सरकारच्या गेल्या १० वर्षांतील कामाचा लेखाजाेखा मांडण्याचा प्रयत्न केला. त्याची तुलना यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळाशी अनेक बाबतीत केली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. ही श्वेतपत्रिका पुढच्याच आठवड्यात मांडण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार २०१४मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या १० वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, माेदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची माेठी जबाबदारी सरकारवर हाेती. लाेकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज हाेती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमाेरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे, असे सीतारामन म्हणाल्या. 

...म्हणूनच जनतेचा  पुन्हा आशीर्वाद : अर्थमंत्रीअर्थव्यवस्था नव्य जाेमाने उभी राहिली. विकासाची फळे लाेकांना प्रत्यक्ष चाखायला मिळाली. देशाला नवी आशा आणि नव्या उद्दिष्टांची जाणीव झाली. त्यामुळे साहजिकच लाेकांनी माेदी सरकारला अधिक माेठ्या बहुमताने २०१९मध्ये पुन्हा आशीर्वाद दिला. आमच्या सरकारने केलेल्या विलक्षण कामांमुळे जनतेचा पुन्हा आशीर्वाद मिळेल आणि दणदणीत विजय मिळवू, असे सीतारामन म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ मध्ये सरकार स्थापन केले, त्यास आता १० वर्षे हाेणार आहेत. त्यावेळी देशासमाेर अनेक आव्हाने हाेती. विकासाच्या वाटेवर अनेक अडचणी हाेत्या. अनेक आर्थिक सुधारणा करणे आवश्यक हाेते. माेदी सरकार आले त्यावेळी देश कुठे हाेता आणि आत्ता कुठे आहे, हे सांगण्यासाठी हीच याेग्य वेळ आहे. त्यापूर्वीच्या १० वर्षांत अर्थव्यवस्था कशी चुकीच्या पद्धतीने सांभाळण्यात आली, हे सांगून त्यातून काय धडा घेतला, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका मांडण्यात येईल.   - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

सरकारचे दावे विराेधाभासी : चिदंबरममाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना सांगितले की, यूपीए सरकारच्या काळात जीडीपी वाढीचा सरासरी दर ७.५ टक्के हाेता. मात्र, सध्याच्या सरकारच्या काळात हा दर ६ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. या सरकारने शेतकरी आत्महत्यांचाही उल्लेख केला नाही. शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे १० हजार ६००, १० हजार ८८१ आणि ११ हजार २९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदी असल्याचा सरकारचा दावा विराेधाभासी आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनकेंद्र सरकारभाजपाकाँग्रेस