घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, घर खरेदी करणं हे काही साधं काम नाही. वर्षानुवर्षे कष्ट केल्यानंतर आपण जो पैसा जमा करू शकतो, त्यानं कुठेतरी पुढे जाऊन घर घेण्याचा विचार करू शकतो. पण आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ मध्ये महिला घर खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. आता महिलांच्या नावे मालमत्ता खरेदीवर रजिस्ट्रीदरम्यान होणाऱ्या मुद्रांक शुल्कात (स्टँप ड्युटीत) सवलत देण्याची प्रस्ताव असल्याची घोषणा करण्यात आलीये. अर्थमंत्र्यांनी महिलांच्या नावे रजिस्ट्रीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव मांडलाय. यामुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना मालमत्ता खरेदी करणाऱ्या महिलांवरील मुद्रांक शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात मालमत्तेची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावं लागतं. याशिवाय सरकारनं अर्थसंकल्प २०२४ मध्ये घरांसाठी इतरही अनेक घोषणा केल्या आहेत.
महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
घरांच्या चढ्या किमती, उच्च मुद्रांक शुल्क हे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचे व्यवहार होण्यामागचं कारण असल्याचं सरकार अनेक दिवसांपासून म्हणत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्क कमी करावं, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी कमी मुद्रांक शुल्क दर देण्याबाबत विचार करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. काही राज्यांमध्ये नोंदणीकृत मालमत्तेच्या मूल्यानुसार मुद्रांक शुल्काचा एकसमान दर आहे. काही राज्यांमध्ये स्लॅब यंत्रणेवर काम करणारे दर आहेत. ज्यामध्ये खरेदी करायच्या मालमत्तेच्या किंमतीसह दर वाढतात. ईशान्येकडील अनेक राज्यं अधिक मुद्रांक शुल्क आकारतात.