- आनंद डेकाटे
नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सौरऊर्जेवर अधिक भर देण्यात आला आहे. यात देशभरात एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा बसवून त्यांना वीजबिलातून दिलासा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली होती.
या योजनेअंतर्गत सौरऊर्जा अधिकाधिक वाढवण्यात येणार आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील ७ शहरांनासुद्धा मिळेल. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे या शहरांचा यात समावेश आहे. मार्चअखेर या शहरांमध्ये प्रत्येकी २५ हजार सोलर रूफ टॉप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावर सोलर रूफ टॉप बसवून सौरऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिलातून दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे.
केंद्र व राज्य सरकारतर्फे सौरऊर्जेवर अधिकाधिक भर देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचाही समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक कोटी कुटुंबांच्या घरावर सौरयंत्रणा बसविण्याचे जाहीर केले. यामुळे ऊर्जेची मोठी गरज भरून निघेल. महाराष्ट्रालाही त्याचा मोठा लाभ मिळेल.
- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनी