नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग असतो. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून अर्थसंकल्पाचा मसुदा तयार केला जातो. सादर झालेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी समजून घेणे जसे अवघड असते तसेच त्याचा मसुदा तयार करणे हे ही अत्यंत क्लिष्ट काम असते. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीममधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर नजर टाकूया.
टी. व्ही. सोमनाथन : अर्थ विभागाच्या सचिवपदी असलेले सोमनाथन खर्च विभागावर देखरेख करतात आणि अर्थमंत्र्यांना आर्थिक वाटपाबाबत मार्गदर्शन करतात. आत्मनिर्भर योजना कार्यान्वित करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ते तामिळनाडू केडरचे आहेत.
पी. के. मिश्रा : केंद्र सरकारच्या सर्व धोरणात्मक बाबींवर पी. के. मिश्रा देखरेख करतात. त्यांना कॅबिनेट रँक अधिकाऱ्याचा दर्जा आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयावर देखरेख करण्याच्या कामात पी. के. मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहायक म्हणून भूमिका निभावतात.
अरविंद श्रीवास्तव : पीएमओमध्ये आर्थिक बाबींसंदर्भातील निर्णय घेण्याची जबाबदारी अरविंद श्रीवास्तव यांच्याकडे आहे. ते मूळचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि निती आयोग हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.
पुण्य सलिला श्रीवास्तव : आयएएस अधिकरी असलेल्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांची नियुक्ती सुरुवातील गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणू झाली होती. नंतर त्यांनी पीएमओमध्ये घेण्यात आले. कोरोनाकाळात त्या दररोज प्रसारमाध्यमांना माहिती देत असत.
हरी रंजन राव : मध्य प्रदेश केडरचे असलेले आयएएस अधिकारी हरी रंजन राव यांच्याकडे पीएमओमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि प्रशासन या विभागांची जबाबदारी आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
आतिश चंद्रा : सध्या पीएमओमध्य असलेले आतिश चंद्रा हे मूळचे बिहार केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास विभागाची जबाबदारी आहे. पीएमओमध्ये सामील होण्यापूर्वी आतिश चंद्रा भारतीय अन्न महामंडळाचे सीएमडी होते.