मुंबई - अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे. त्यात विशेषत: महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
१ कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे. गरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करून युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतिकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना महत्त्वाची आहे. विकासाची दिशा सांगणारा पण आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अर्थसंकल्प आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
आत्मनिर्भर, बलशाली भारताचा पाया - शिंदेसर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे हे फलित असून देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांची मने जिंकली - पवारअर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊन सर्वसामान्य माणसांची मने जिंकणारा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.