Budget 2024 For Indian Railway: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीने आर्थिक विकास झाला आहे. जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. यावेळी भारतीय रेल्वेसाठी तीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेसाठी तीन स्वतंत्र कॉरिडॉर उभारणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच हे तीन कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सीमेंट यांसाठी स्वतंत्ररित्या बनवले जातील. पीएम गति-शक्ति योजनेवर भर देण्यात येणार आहे. तसेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे विकासदर वाढण्यासाठी मदत मिळू शकेल. या स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूक सुलभ होऊ शकेल. तसेच प्रवासी वाहतुकीलाही याचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
४० हजार सामान्य डबे वंदे भारतच्या धर्तीवर विकसित करणार
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर तसेच सोयी-सुविधांवर भर देण्यात येणार असून, त्या वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच रेल्वेचे ४० हजार सामान्य डबे आता वंदे भारतच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहेत. यामुळे सुरक्षितता आणि सुलभता आणखी अद्ययावत होऊ शकेल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दरम्यान, मेट्रो आणि नमो भारत या सेवांचा विस्तार केला जाणार आहे. बड्या शहरांमध्ये मेट्रो आणि नमो भारत सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. यांसारख्या प्रवासी ट्रेनच्या संचालनात सुधारणा केल्याने प्रवासाचा वेग वाढेल आणि सुरक्षित प्रवासाचा एक उत्तम पर्याय देता येईल, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.