Join us

मोदी सरकार ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू; अर्थमंत्र्यांसमोर 'ही' आहेत मोठी आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:10 IST

Budget 2025 : मोदी सरकारने २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. दरवेळीप्रमाणे या वर्षी देखील ६ डिसेंबरपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरू करणार आहेत.

Budget 2025 : दरवर्षी सर्वसाधारणपणे फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर होतो. पण त्याची तयारी २-३ महिने आधीच सुरू होते. मोदी सरकार ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी आता सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ६ डिसेंबरपासून विविध पक्षांसोबत अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरू करणार आहेत. या प्रक्रियेअंतर्गत अर्थमंत्री नामवंत अर्थतज्ज्ञांना भेटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकांमध्ये सरकारला विविध उद्योग संघटनांना भेटून अर्थसंकल्पाबाबत त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या आहेत.

अर्थमंत्र्यांसमोर समस्यांचा डोंगरचालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ७ तिमाहींमधील सर्वात कमी ५.४ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे महागाई सातत्याने वाढत असून आरबीआय व्याजदर कमी करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. अशा परिस्थितीत सामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूदी केल्या जातात. हे पाहणे महत्त्वाचे आहे. देशाची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.

अर्थसंकल्पाबाबत कोणासोबत करणार चर्चा?अर्थसंकल्पाच्या तयारीच्या ७ डिसेंबर रोजी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत अर्थमंत्र्यांची बैठक होणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल, जो २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरणात्मक दिशा देईल. अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत ३० डिसेंबर रोजी भारतीय उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज, विशेषकरुन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी केली जाईल. कामगार संघटना, वित्तीय क्षेत्र, सेवा क्षेत्र आदींशीही अर्थमंत्री बैठका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अर्थसंकल्प हा सरकारचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा असण्याशिवाय अनेक महत्त्वाचे आकडे असतात. दरवर्षी ५ टप्प्यांत अर्थसंकल्प तयार केला जातो. अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प तयार करतो. परंतु, अनेक विभागांशी परस्पर चर्चा करून ते तयार केले जाते.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामननिर्मला सीतारामनअर्थसंकल्पीय अधिवेशन