Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंत सर्वात कमी वेळाचं भाषण करत सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा नवा विक्रम आपल्या नावे केला. या अर्थसंकल्पात तरुण, शेतकरी, महिला आणि गरिबांसाठी अनेक नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. शहरी कामगार आणि ताशी काम करणाऱ्यांसाठी (गीग वर्कर्स) अनेक घोषणा केल्या आहेत.
गीग वर्कर आणि शहरी कामगारांना सामाजिक सुरक्षा
गेल्या काही वर्षात देशात क्विक कॉमर्स क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. या क्षेत्रात हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. झोमॅटो, स्विगी, फ्लिफकार्ट, बिग बास्केट अशा अनेक दिग्गज कंपन्या या क्षेत्रात आहेत. मात्र, या क्षेत्रात काम करणारे डिलिव्हरी बॉईज, गीग वर्कर यांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नाही. मात्र, आता या सर्व कामगारांचा नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात येणार आहे. याशिवाय गीग वर्कर्ससाठी सरकार आरोग्य विमा योजना आणणार आहे.
शहरी कामगारांना कर्ज मिळणार
पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत कर्जाची मर्यादाही अर्थसंकल्पात वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की पीएम स्वानिधी योजना बँकांकडून वाढीव कर्जाची घोषणा केली आहे. ३०,००० रुपयांच्या मर्यादेसह यूपीआय लिंक क्रेडिट कार्ड आणि क्षमता निर्माण सहाय्याने सुधारित केली जाणार आहे.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्जमर्यादा वाढवणार
गीग कामगारांव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठीही काही घोषणा केल्या आहेत. मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, क्रेडिटची उपलब्धता सुधारण्यासाठी, क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवले जाईल. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी ५ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर झालेल्यांना पुढील ५ वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मिळेल. स्टार्टअप्ससाठी महत्त्वाच्या असलेल्या २७ फोकस क्षेत्रांमध्ये १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपयांपर्यंत कर्जासाठी हमी शुल्क १% ने कमी केले जात आहे. आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्त्वाचे असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.