उद्या १ फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पापूर्वी, जानेवारी महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनात १०.४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यासह संकलनाने १.७२ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे आजपर्यंतचे दुसरे सर्वात मोठे मासिक संकलन आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तिसऱ्यांदा संकलनाने १.७० लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
एप्रिल २०२३-जानेवारी २०२४ या कालावधीत GST संकलनात वार्षिक ११.६% वाढ झाली आहे. यासह, चालू आर्थिक वर्षातील संकलन १६.६९ लाख कोटींवर पोहोचले आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत (एप्रिल २०२२-जानेवारी २०२३) १४.९६ लाख कोटी रुपये जमा झाले होते.
'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या
डिसेंबर २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६४,८८२ कोटी रुपये होते. यापैकी सीजीएसटी ३०,४४३ कोटी रुपये आहे. SGST ३७,९३५ कोटी रुपये, IGST ८४,२५५ कोटी रुपये आणि उपकर १२,२४९ कोटी रुपये आहे. या वर्षातील आतापर्यंतचा हा सातवा महिना आहे, यामध्ये १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संकलन झाले आहे.
कोर क्षेत्रातील आकडेवारी
दरम्यान, डिसेंबर २०२३ साठी आठ प्रमुख उद्योगांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्षेत्राचा वेग ३.८ टक्क्यांच्या १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्पादनात ८.३ टक्के वाढ झाली होती. या काळात कच्चे तेल, वीज, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची कामगिरी कमकुवत राहिली. आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा यांचा समावेश होतो. नोव्हेंबरमध्ये त्यांची वाढ ७.९ टक्के होती.
डिसेंबर २०२३ अखेर केंद्र सरकारची वित्तीय तूट ९.८२ लाख कोटी रुपये आहे, हे वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५५ टक्के आहे. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत वित्तीय तूट २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ५९.८ टक्के होती.