नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट संसदेत सादर करतील. भारतीय जनता पार्टीने केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळविल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्या रूपाने पहिल्यांदा एका महिलेकडे हे महत्त्वाचे खाते देण्यात आले. काही वर्षांपूर्वी बजेट सायंकाळी मांडले जात असे; पण नंतर याच्या वेळा बदलल्या. जाणून घेऊया बजेट सादर करण्याची प्रक्रिया कशी बदलली.
पहिले अर्थमंत्री आर. के. शनमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी इंग्लंडच्या राजघराण्यासमोर ईस्ट इंडिया कंपनीचे जेम्स विल्सन यांनी सादर केला होता.
मोरारजी देसाई यांनी १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.
२०१७ साली रेल्वेचा अर्थसंकल्प पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. यापूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात असे.
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदावर असताना देशाचा अर्थसंकल्प सादर केला.
१९९९ पर्यंत बजेट फेब्रुवारीत अखेरच्या दिवशी सायंकाळी मांडले जात असे. अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ते सकाळी ११ वाजता मांडले.
२०१६ पासून अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करणे सुरू केले.
१९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प सादर केला होता.
२०२२ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दाेन तास ४२ मिनिटांचे सर्वांत लांब भाषण दिले.
१९५० साली पहिल्यांदा अर्थसंकल्प लीक झाला. तोवर राष्ट्रपतीभवनात अर्थसंकल्पाची छपाई केली जात असे. नंतर नवी दिल्लीत मिंटो रोडवरील एका प्रेसमध्ये छपाई करण्यात येऊ लागली.
२०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला.