Join us

शहरातील गरिबांसाठी २० लाख घरे बांधणार

By admin | Published: June 20, 2017 12:56 AM

दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (नगर) शहरी भागातील गरिबांसाठी २० लाख स्वस्त घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (नगर) शहरी भागातील गरिबांसाठी २० लाख स्वस्त घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. देशातील ४,७२० शहरे आणि नगरांतील गरिबांना याचा लाभ मिळेल. केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी येथे ही माहिती दिली. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे या योजनेंतर्गत १ लाख ९ हजार घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात गृहनिर्माण कार्याला वेग आला असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ १३ लाख ८२ हजार ७६८ घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. यावरून मोदी सरकारच्या काळात गृहनिर्माण कार्याची गती वाढल्याचे स्पष्ट होते. इतरांनी दहा वर्षांत जे केले ते केवळ तीन वर्षांत साध्य केले जात असेल तर हे सरकार इतरांपेक्षा वेगळे असल्याचे स्पष्टच आहे, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. नायडू म्हणाले की २०२० सालपर्यंत देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला घर देण्याचे लक्ष्य हे आव्हानात्मक काम आहे. मात्र सर्व राज्य सरकारने आणि शहर पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व या संधीचे सोने करतील, अशी आशा केंद्र सरकारला आशा आहे. केंद्र सरकारला जे करता येणे शक्य होते ते त्याने केले आहे, असेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित होते.