मुंबई : महारेराकडे नोंदणी करताना सर्व गृहनिर्माण प्रकल्प प्रवर्तकांना (प्रमोटर) स्वतःसह संबंधित प्रकल्पाशी इतर संचालक, पदनामनिर्देशित भागीदार, प्रकल्पाशी संबंधित इतर प्रकल्पांचे भागीदार, मर्यादित दायित्व भागीदार, प्रवर्तकाच्या संस्थेचे भागीदार, प्रकल्पाशी संबंधित कुठल्याही संस्थेचे मालक या सर्वांची दिन क्रमांकासह देशातील कुठल्याही रेराकडे नोंदणीकृत केलेल्या प्रकल्पांची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. असे केले नाही तर त्या प्रकल्पाची महारेराकडे नोंदणीच होणार नाही आणि ही नोंदणी झाल्याने ग्राहकांना याबाबतची माहिती सहज मिळणार असल्याने ते वेळीच सावध होतील. परिणामी घर घेताना त्याची फसवणूक होणार नाही.
एखाद्या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्यास काही प्रकल्प प्रवर्तक रेराकडे नोंदणी करताना प्रकल्पाचा तपशील देणे टाळतात. नोंदणी करत असलेला पहिलाच प्रकल्प असल्याचे भासवतात. प्रकल्पाची नावे बदलून नवनवीन प्रकल्पात सहभागी होतात. त्याचा फटका ते सुरू करत असलेल्या नवीन प्रकल्पांनाही बसू शकतो. प्रकल्पात नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाही बसू शकतो. आता महारेरा नोंदणीसाठी प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करायच्या या स्व-प्रतिज्ञापत्राच्या तरतुदीमुळे प्रवर्तकाला अशी माहिती लपवण्याची सोय नाही. त्यामुळे खरेदीदारांच्या या क्षेत्रातील फसवणुकीला आळा बसायला मदत होणार आहे.
फॉर्ममध्ये काय ?
महारेराकडे नोंदणी करताना प्रकल्प व्यवस्थापकांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये प्रकल्प पूर्ण झाल्याची तारीख, प्रकल्पाशी संबंधित कुठल्याही रेराकडे तक्रार प्रलंबित असल्यास त्याचा क्रमांक, भरपाईपोटी प्रकल्पाच्या विरुद्ध एखादे वॉरंट जारी झाले असल्यास त्याचा संपूर्ण तपशील, शिवाय रेराने प्रकल्पाची नोंदणी रद्द केलेली असेल तर तेही नोंदवावे लागणार आहे.
ग्राहकांना काय माहिती मिळणार?
नवीन प्रकल्पात सदनिका, प्लाॅटसाठी नोंदणी करताना प्रवर्तक आणि प्रकल्पातील सर्व संचालक यांची प्रकल्प पूर्ण करण्याबाबतची माहिती मिळणार.
प्रकल्प पूर्ण करण्याची त्यांची आर्थिक क्षमता आहे की नाही.
आतापर्यंत किती प्रकल्प केले, ते वेळेत पूर्ण केले का, त्यांच्या प्रकल्पाविरोधात तक्रारी आहेत का ? अशी माहिती ग्राहकांना खरेदीपूर्वी मिळणार.
दिन क्रमांक उपलब्ध असल्याने नेटवर जाऊन सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. भूखंड, सदनिका गुंतवणूक करताना निर्णय घ्यायला मदत होईल.