प्रसाद गो. जोशी
शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला असून आता निफ्टी २१ हजारांचा जादुई आकडा पार करण्याकडे बाजाराचे लक्ष आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम राखले असले तरी अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह काय करणार यावर बाजाराची आगामी वाटचाल अवलंबून आहे. याशिवाय भारत आणि अमेरिकेतील चलनवाढीची स्थिततीही बाजाराचे नूर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
गतसप्ताहामध्ये निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. संवेदनशील निर्देशांक २३४४.४१ अंशांची झेप घेत ६९,८२५.६० अंशांवर पोहोचला आहे. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २०,९६९.४० अंशांवर पाेहोचला आहे. तो या सप्ताहामध्ये २१ हजार अंशांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांची आगेकूच सुरूच आहे. हे निर्देशांक अनुक्रमे ७०४.१५ आणि ५३८.५३ अंशांनी वाढले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दर कायम राखल्याचा आनंद बाजाराने साजरा केला. आता अमेरिका काय करते याकडे लक्ष आहे. या सप्ताहात अमेरिका व भारताच्या चलनवाढीची आकडेवारी जाहीर होईल. अमेरिकेची चलनवाढ स्थिर राहू शकते, मात्र भारतात ती वाढण्याची भीती आहे. त्यावर बाजाराची दिशा ठरणार आहे.
परकीय वित्तसंस्थांनी ओतले २६,५०५ कोटी
या महिन्याच्या सहा दिवसांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये २६,५०५ कोटी रुपये ओतले आहेत. पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने परकीय वित्तसंस्था आक्रमकपणे भारतामध्ये गुंतवणूक करू लागल्या आहेत.
अमेरिकेमधील बॉण्डसचे व्याजदर कमी झाल्याचा परिणाम होत असतानाच भारतामधील अनुकूल वातावरणाचा फायदा या संस्थांनी घेतला आहे. चालू वर्षामध्ये आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतातील शेअरमध्ये १.३१ लाख कोटी रुपये, तर बॉण्डस्मध्ये ५५७६७ कोटी रुपये गुंतविले आहेत.