Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारमध्ये ब्रेक्झिटमुळे ‘बंपर सेल’

शेअर बाजारमध्ये ब्रेक्झिटमुळे ‘बंपर सेल’

महाकाय कंपन्यांच्या समभागात लक्षणीय घसरण झाल्यामुळे, हे समभाग खरेदी करण्याची उत्तम संधी सध्या असल्याचे मत शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले

By admin | Published: June 28, 2016 03:37 AM2016-06-28T03:37:19+5:302016-06-28T03:37:19+5:30

महाकाय कंपन्यांच्या समभागात लक्षणीय घसरण झाल्यामुळे, हे समभाग खरेदी करण्याची उत्तम संधी सध्या असल्याचे मत शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले

'Bumper Sale' due to break-in market | शेअर बाजारमध्ये ब्रेक्झिटमुळे ‘बंपर सेल’

शेअर बाजारमध्ये ब्रेक्झिटमुळे ‘बंपर सेल’


मुंबई : युरोपीय महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अर्थकंपाचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरू राहणार असून, भारतीय शेअर बाजारात कार्यरत असलेल्या अनेक महाकाय कंपन्यांच्या समभागात लक्षणीय घसरण झाल्यामुळे, हे समभाग खरेदी करण्याची उत्तम संधी सध्या असल्याचे मत शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
ब्रेक्झिटच्या झटक्यात ३० सर्वोत्तम कंपन्यांच्या मिलाफातून निर्माण करण्यात आलेल्या सेन्सेक्स श्रेणीमधील तब्बल २३ कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाली. याखेरीज अनेक विविध श्रेणीत व्यवहार करणाऱ्या उत्तम कंपन्यांच्या समभागांतही दीड ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाल्यामुळे ते सध्या आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत.
ब्रेक्झिटबाबत मतदारांनी कौल दिल्यानंतर जगातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ब्रेक्झिटचा भारतीय अर्थकारणावर फारसा परिणाम होणार नसला तरी, या अर्थकंपामुळे देशातील प्रमुख बाजार मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारात एक हजार अंशांची घसरण झाली. परकीय वित्तीय संस्थांनी आपल्याकडील समभागांची विक्री करत भारतीय बाजारातून काढता पाय घेतला. या संस्थांची प्रामुख्याने गुंतवणूक सेन्सेक्स व तत्सम भक्कम श्रेणीतील कंपन्यांमध्ये होती. या वित्तीय संस्थांनी पैसा काढून घेतल्याने स्वाभाविकपणे या कंपन्यांच्या समभागांत घसरण झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, ब्रेक्झिटचे निकाल आले, त्या दिवशी मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारातून परकीय वित्तीय संस्थांनी ३३०० कोटी रुपये मूल्याच्या समभागांचा विक्री केली. बाजारात होणारी पडझड थांबविण्यासाठी सरकारी कंपन्या आणि देशी वित्तीय संस्थांनी १२०० कोटी रुपयांपर्यंत खरेदी केली. मात्र, परदेशी वित्तीय संस्थांचा विक्री करण्याच्या माऱ्याचा फोर्स आणि त्यांच्यामुळे भांबावलेल्या शेअर बाजारातील अन्य घटकांनी केलेली विक्री यासमोर खरेदीचा जोर फारसा टिकला नाही. अर्थतज्ज्ञांच्या मते, ब्रेक्झिटच्या निर्णयाचा भारतीय अर्थकारणावर फारसा परिणाम होणार नाही. ज्या भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये व्यवसाय करत आहेत, त्या कंपन्यांना निश्चितपणे याचा फटका बसेल. पण भारतीय अर्थव्यवस्था, आणि युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्याशी असलेल्या संबंधांचा विचार करता हा फटका तितकासा बसणार नाही. या घटनेनंतर, जगभरातील चलनामध्ये मोठी घसरण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. पण भारताकडे विदेशी चलनाचा मुबलक साठा असल्याने अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपया फारसा कोसळणार नाही, हेही ब्रेक्झिटचा निकाल लागल्याच्या दिवशीच दिसून आले. (प्रतिनिधी)
>चांगला परतावा शक्य
शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा फटका हा सर्वच क्षेत्रातील कंपन्यांना बसला असला तरी, त्यातही माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, रसायन उद्योग, बांधकाम उद्योग अशा काही प्रमुख क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या समभागांच्या किमतीनी ८ महिने ते दीड वर्ष असा घसरणीचा नीचांक गाठला आहे.
गुंतवणूकदाराने तीन ते पाच वर्षांचा कालावधी डोळ््यासमोर ठेवला तर, त्याला उत्तम परतावा मिळू शकतो, असे मत विश्लेषक अजय चोक्सी यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Bumper Sale' due to break-in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.