Lokmat Money > बिझनेस न्यूज > खरेदीमुळे तेजी कायम; निफ्टी ८९००च्या पार

खरेदीमुळे तेजी कायम; निफ्टी ८९००च्या पार

गुंतवणूकदारांनी खरेदी चालूच ठेवल्याने सलग पाचव्या सप्ताहामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 04:58 AM2017-02-27T04:58:15+5:302017-02-27T04:58:15+5:30

गुंतवणूकदारांनी खरेदी चालूच ठेवल्याने सलग पाचव्या सप्ताहामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.

Buoyancy by buying; Nifty crosses 8900 | खरेदीमुळे तेजी कायम; निफ्टी ८९००च्या पार

खरेदीमुळे तेजी कायम; निफ्टी ८९००च्या पार


-प्रसाद गो. जोशी
गुंतवणूकदारांनी खरेदी चालूच ठेवल्याने सलग पाचव्या सप्ताहामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. निफ्टीने ८९०० अंशांचा टप्पा पार केल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्याची सौदापूर्ती चांगली झाल्यानेही बाजारामध्ये सकारात्मक वातावरण राहिले. जगभरातील बाजारांमध्ये मात्र, गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा असलेला दिसून आला.
बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गतसप्ताहापेक्षा वाढीव पातळीवर सुरू झाला. सप्ताहादरम्यान तो २९०६५ ते २८४१९ अंशांदरम्यान हेलकावत अखेरीस, २८८९२.९७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ४२४.२२ अंश म्हणजेच १.४९ टक्के वाढ झाली. गेल्या महिनाभरात त्यामध्ये १८५८.४७ अंशांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.३४ टक्के म्हणजेच ११७.८० अंशांनी वाढून ८९३९.५० अंशांवर बंद झाला. निफ्टी ८९०० अंशांच्या पुढे गेल्याने गुंतवणूकदारांना भावनिक आधार मिळाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे.
गतसप्ताह हा विलिनीकरणाच्या बातम्यांचा ठरला. बुधवारी केंद्र सरकारने भारतीय स्टेट बॅँकेच्या पाच सहयोगी बॅँकांच्या स्टेट बॅँकेतील विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. या पाठोपाठच व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलिनीकरणाची बातमी आली, तसेच भारती एअरटेलने टेलिनॉर इंडिया ताब्यात घेण्याचे निश्चित केल्याने दूरसंचारचे समभाग तेजीत राहिले. रिलायन्सच्या जिओने एप्रिलपासून नवे दर जाहीर केले असले, तरी अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ते कमीच असल्याने या क्षेत्रामध्ये आता पुन्हा गळेकापू स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. टीसीएसने १६ हजार कोटी रुपयांच्या समभागांची पुनर्खरेदी करण्याची घोषणा केली आहे. एनएचपीसीनेही ८१ कोटी समभागांच्या फेरखरेदीची आॅफर दिली आहे.
>स्टेट बँक आॅफ त्रावणकोरची बाँडविक्री
भारतीय स्टेट बॅँकेच्या सहयोगी बॅँकांचे स्टेट बॅँकेमध्ये विलीनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली असली, तरी स्टेट बॅँक आॅफ त्रावणकोर सुमारे ६०० कोटी रुपयांची बाँडविक्री करून आपले भागभांडवल वाढविणार आहे. बॅँकेच्या प्रस्तावाला संचालक मंडळातील कार्यकारी गटाने नुकतीच मान्यता दिली आहे.
बेसल नियमावलीनुसार बॅँकांना आपले टिअर १ भांडवल वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे स्टेट बॅँक आॅफ त्रावणकोर ६०० कोटी रुपयांचे बाँडस् प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे विक्रीसाठी आणणार आहे. बॅँकेच्या संचालक मंडळाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. स्टेट बॅँक आॅफ त्रावणकोरचे स्टेट बॅँकेत विलीनीकरण होणार असले, तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे भागभांडवलाची पूर्तता करण्यासाठी बाँडविक्रीचा पर्याय सदर बॅँकेने निवडला आहे.

Web Title: Buoyancy by buying; Nifty crosses 8900

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.