नवी दिल्ली-
ऑनलाइन ब्रोकिंग फर्म जेरोधाचे (Zerodha) सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक जबरदस्त पाऊल उचललं आहे. नितीन कामथ यांचं हे पाऊल आरोग्याशी संबंधित आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या फिटनेससाठी दैनंदिन पातळीवर त्यांनी व्यायामाचं आपलं एक लक्ष्य निश्चित करावं असं आवाहन केलं आहे. जो कर्मचारी आपलं फिटनेस लक्ष्य पूर्ण करेल त्याला बोनस स्वरुपात एका महिन्याची एक्स्ट्रा सॅलरी दिली जाईल अशी जबरदस्त योजना आणली आहे.
नितीन कामथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. कामथ यांनी फिटनेस ट्रॅकवर आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज एक लक्ष्य निश्चित करण्याचं आव्हान दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक लिंक्डइन पोस्ट केली आहे. कंपनीचे बहुतांश कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे एका जागेवर तासंतास बसून राहणं आणि धूम्रपानाच्या सवयीत वाढ झाली आहे. यासाठी आम्ही आमच्या टीमला आरोग्याच्या दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी एक चॅलेंज दिलं आहे. फिटनेस ट्रॅकरचा वापर करुन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घडलेला बदल आम्हाला पाहायचा आहे, असं नितीन कामथ यांनी म्हटलं आहे.
बोनससाठी नेमकं काय करावं लागेल?
कामथ यांच्या चॅलेंजनुसार एका महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या दैंनदिन फिटनेस टार्गेट ९० टक्क्यांपर्यंत गाठणं महत्वाचं असणार आहे. यासोबतच १० लाख रुपयांसाठीचा एक लकी-ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे. कामथ यांनी आपल्या पोस्टमध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. "जेरोधामध्ये आमचं नवं चॅलेंज फिटनेस ट्रॅकर्सवर डेली टार्गेट सेट करावं लागणार आहे. एका वर्षासाठी जो कर्मचारी आपलं दैनंदिन टार्गेट ९० टक्के पूर्ण करण्यात यशस्वी होईल त्याला एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल", असं कामथ यांनी म्हटलं आहे.
खाण्या-पिण्यावर द्या लक्ष
"कोरोना काळात माझं वजन वाढलं होतं. मी माझ्यासाठी फिटनेस गोल्स सेट केले आणि वजन कमी केलं. आरोग्यवर्धक खाण्यापिण्यावर कर्मचाऱ्यांनी भर द्यावा असं मला वाटतं. यासाठी कर्मचारी जागरुक असायला हवेत", असं कामथ म्हणाले. कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज देण्याची कामथ यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी असं चॅलेंज दिलं होतं.
कामथ बंधूंनी २०१० साली जेरोधा कंपनीची स्थापना केलीहोती. जेरोधा एक फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार करते. तसंच म्युच्युअल फंड ट्रान्झाक्शनसाठी एक प्लॅटफॉम उपलब्ध करुन देते.