Success Story : सध्याच्या घडीला 'Boat' या कंपनीचं नाव सर्वश्रुत झालंय. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत इअर फोन, इअर पॉड्स तसेच बोट कंपनी निर्मित घड्याळे आवडीने वापरताना दिसतात. खरं तर यामागे मेहनत आहे ती कंपनीचे संस्थापक अमन गुप्ता यांची.
अमान गुप्ता यांचा उद्योग क्षेत्रातील प्रवास वाटतोय तितका सोपा नव्हता. लहानपणापासून व्यवसायाची गोडी असणाऱ्या अमन गुप्ता यांना यशस्वी उद्योजक बनायचं होतं. प्रारंभीच्या काळात मोठ्या संघर्षाला तोंड देत त्यांनी या कंपनीची उभारणी केली. काही स्टार्टअप सुरु केले पण त्यातही तितकंस यश त्यांना मिळालं नाही. पदरी पडली ती निराशा! पण अशा परिस्थितीतही न डगमगता असंख्य अडचणींशी अमन यांनी दोन हात केले. सध्या उद्योग जगतात आपल नवं विश्व स्थापण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ते प्रेरेणेचे स्त्रोत बनले आहेत. पेशाने सीए असणाऱ्या अमन गुप्ता यांनी भारतातील प्रसिद्ध व्यवसायिकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
शैक्षणिक प्रवास :
मीडिया रिपोर्टनुसार, अमन यांनी दिल्ली विद्यापीठातून सीए कोर्स पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेची वाट धरली. अमेरिकेत अमन यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. आपला मुलगा चार्टड अकाउंटंट बनावा अशी त्यांच्या वडिलांची मनोमन इच्छा होती. परंतु अमन यांना नोकरी करायची नव्हती. स्व: बळावर स्वत: च नवं विश्व त्यांना उभारायचं होतं. सीए झाल्यानंतर अमन यांनी काही काळ सिटी बॅंकमध्ये नोकरी केली.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म :
अमन यांचा जन्म १९८२ मध्ये दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दिल्ली विद्यापीठात सीए परीक्षा पास करणारा सर्वात कमी वयाचा तरुण म्हणून आजदेखील अमन यांच्याकडे पाहिलं जातं.
व्यवसायात पदार्पण :
बोट कंपनीची स्थापना करण्यापूर्वी अमन यांनी ५ वेगवेगळे स्टार्टअप सुरु केले होते. पण नशीबाने त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली नाही. त्या पाचही कंपन्या टाळेबंद झाल्या. हेच कमी होतं की काय आर्थिक तंगी असल्याने अमन यांनी बॅंकेकडे कर्जासाठी अप्लाय केला पण बॅंकेने त्यांचा अर्ज नाकारलं. ऐवढं सगळं होऊनही त्यांनी हार मानली नाही. आणखी जोमाने सुरुवात करत २०१६ मध्ये 'Boat' ची स्थापनी केली. सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये कंपनी इअरफोन, हेडफोन,स्पीकर,चार्जर विकले. आजच्या घडीला जगभरात एक ट्रस्टेड, विश्वासू ब्रॅंड प्रोडक्ट म्हणून बोट कंपनीकडे पाहिलं जातं.