नवी दिल्ली - पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. आपण कुठेही बाहेर गेलो की मिनिरल वॉटर हमखास घेतो. सध्या ती गरज बनली असून या व्यवसायाला मोठी मागणी आहे. भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय दरवर्षी 20% दराने वाढत आहे. आरओ किंवा मिनरल वॉटरच्या व्यवसायात ब्रँडेड कंपन्या उतरल्या आहेत. बाजारात 1 रुपयांच्या पाऊचपासून ते 20 रुपये लिटरच्या बाटलीपर्यंत पाणी उपलब्ध आहे. पण बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेतील 75 टक्के वाटा हा 1 लीटरच्या बाटलीबंद पाण्याचा आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता. कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी हा व्यवसाय उत्तम आहे.
असं करा प्लॅनिंग
जर तुम्ही मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम एक कंपनी सुरू करा. कंपनी कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करा. कंपनीचा पॅन नंबर आणि जीएसटी नंबर इत्यादी घ्या कारण ते आवश्यक आहे. बोअरिंग, आरओ, चिलर मशीन कॅन ठेवण्यासाठी 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागा लागेल. जेणेकरून पाणी साठवण्यासाठी टाक्या करता येतील.
असा लावा वॉटर टँक
सर्वप्रथम कंपनीसाठी अशी जागा निवडा जिथे तुम्हाला पाण्यासाठी कमी टीडीएस द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला प्रशासनाकडून लायसन्स आणि आयएसआय क्रमांक घ्यावा लागेल. अनेक कंपन्या 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे व्यावसायिक आरओ प्लांट बनवत आहेत. याशिवाय तुम्हाला किमान 100 जार (20 लीटर क्षमतेचे) खरेदी करावे लागतील. या सगळ्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही बँकेकडून कर्जासाठीही अर्ज करू शकता. तासाला 1000 लीटर पाणी तयार होणारा प्लांट सुरू केल्यास किमान 30 ते 50 हजार रुपये कमावता येतात.
असा होईल फायदा
आरओ वॉटरच्या व्यवसायात अनेकजण काम करत आहेत. जर गुणवत्ता आणि वितरण चांगलं असेल तर कमाई चांगली आहे. तुमचे 150 नियमित ग्राहक असतील आणि दररोज तुम्ही प्रतिव्यक्ती एक कंटेनर पाणी पुरवठा करत असाल आणि एका कंटेनरची किंमत 25 रुपये असेल, तर महिन्याला 1,12,500 रुपयांची कमाई होतील. यामध्ये पगार, भाडे, वीज बिल, डिझेल व इतर खर्च काढल्यानंतर 20 ते 25 हजारांचा नफा होईल. तुमचे ग्राहक वाढल्यास नफा देखील वाढत जाईल.
पाणीपुरवठ्यात काही अडचण आल्यास व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तसेच बाटल्या आणि झाकणं मोठ्या प्रमाणात फुटतात, तर त्याचा खर्च येऊ शकतो. हेच या व्यवसायाचे नुकसान आहे. देशात अनेक मोठ्या कंपन्या बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत आहेत. Bisleri, Aquafina, Kinley या ब्रँड्सच्या 200 ml ते एक लिटर पर्यंतच्या पाण्याच्या बाटल्यांना प्रचंड मागणी आहे. याशिवाय ते 20 लिटरचे जारही पुरवतात. तुम्ही या कंपन्यांकडून डिस्ट्रिब्युटरशिप घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये गुंतवावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.