नवी दिल्ली : कोरोनानंतर गेल्या वर्षभरात अनेकजण शेतीव्यवसायाकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही शेती करत असाल आणि जास्त कमाईचे पीक शोधत असाल तर पळसाच्या झाडांची लागवड करून तुम्ही जास्त कमाई करू शकता. पळसाचे फूल विविध नावांनी ओळखले जाते. या फुलाला इतर फुलांसारखा सुगंध नसला तरी अनेक गुण या फुलांमध्ये आढळतात.
पळसाचे हे फुल आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. या फुलाला उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. त्याला परसा, ढक, सू, किशक, सुका, ब्रह्मवृक्ष आणि फ्लेम ऑफ फॉरेस्ट इत्यादी नावांनी संबोधले जाते. या फुलाची लागवड करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. त्याची लागवड कशी करायची ते जाणून घेऊया.
पळसाच्या फूलामध्ये अनेक गुण आहेत
पळसाची फुले ही सेंद्रिय रंगांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. फुलांशिवाय पळसाच्या बिया, पाने, साल, मुळे आणि लाकूड यांचाही वापर केला जातो. आयुर्वेदिक पावडर आणि त्यापासून बनवलेले तेलही चांगल्या दरात विकले जाते. या फुलाचा वापर होळीचे रंग बनवण्यासाठीही केला जातो. हे फूल चित्रकूट, माणिकपूर, बांदा, उत्तर प्रदेशातील महोबा आणि मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथे आढळते. याचबरोबर झारखंड आणि दक्षिण भारतातील काही भागातही या फुलांची लागवड केली जाते.
एकदाच करावी लागवड, होईल आयुष्यभराची कमाई
देशातील अनेक शेतकरी पळसाच्या फुलांची लागवड करून भरघोस कमाई करत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या फुलाच्या लागवडीत घट झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला शेती करण्याची ही चांगली संधी आहे. पळसाचे रोप लावल्यानंतर 3-4 वर्षांनी फुले येण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 1 एकर शेतात 50 हजार रुपये खर्च करून पळस बागकाम करू शकता. एकदा लागवड केली की पुढील 30 वर्षांसाठी उत्पन्न घेता येईल.
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे पळस
पळसाच्या झाडापासून मिळणारे सर्व काही गुणांनी भरपूर असते. ते अनेक प्रकारच्या रोगांवर देखील वापरले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते नाकातून, कानातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून रक्तस्राव होत असल्यास पळसाच्या सालाचा काढा करून प्यायल्याने खूप फायदा होतो. याउलट पळस डिंक साखरेत मिसळून दूध किंवा आवळ्याच्या रसात घेतल्याने हाडे मजबूत होतात.