Adani vs Buffett: ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत यावर्षी प्रचंड वाढ झाली. त्यांनी गुगलचे संस्थापक (Google Founder) लॅरी पेज आणि सर्जी बिन यांना मागे टाकलं आहे. अदानी सध्या ११.८ हजार कोटी डॉलर्स (९ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत ५०० व्यक्तींची यादी असलेल्या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या पहिल्या १० श्रीमंतांपैकी केवळ दोनच श्रीमंतांची संपत्ती यावेळी वाढली आहे. यातील पहिलं नाव म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani) आणि वॉरेन बफे (Warren Buffett). जर या वर्षाबद्दल सांगायचं झालं तर अदानी यांची संपत्ती बफे यांच्या तुलनेत अडीच पट वेगानं वाढली आहे.
दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे हे १२.७ हजार कोटी डॉलर्स (९.६८ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर आता अदानी हे बफे यांच्यापासून ९०० कोटी डॉलर्सनं (६८.६ हजार कोटी रुपये) मागे आहेत. बफे यांच्या संपत्तीत २०२२ मध्ये १७६० कोटी डॉलर्सची वाढ झाली. तर अदानी यांच्या संपत्तीत यावेळी ४११० कोटी डॉलर्सची वाढ झाली. तर टेस्ला (Tesla) चे एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
Adani Group च्या शेअर्सची कमाल
गौतम अदानी यांचा व्यवसाय क्लिन एनर्जी, एअरपोर्ट्स आणि पॉवर प्लांट्समध्ये आदी क्षेत्रांमध्येही पसरलेला आहे. दरम्यान शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं त्यांच्या संपत्तीत भर पडली. अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती यावेळी दुपटीनं वाढल्या आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार रिलायन्सचे (Reliance) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील पहिल्या १० श्रीमंतांमध्येही नाहीत. अंबानींची संपत्ती ९५२० कोटी डॉलर्स (७.२६ लाख कोटी रुपये) एवढी आहे आणि या श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या स्थानावर आहेत.