देशातील आघाडीचा औद्योगिक समूह टाटा ग्रुप पुन्हा एकदा ब्युटी अँड पर्सनल केअर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. देशभरात 20 ब्युटी टेक स्टोअर्स उघडण्याची समुहाची योजना आहे. यासाठी टाटा समूह विदेशी ब्रँडशी चर्चादेखील करत आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या क्षेत्रात टाटा समुहाची थेट स्पर्धा LVMH च्या ब्रँड Sephora आणि देशांतर्गत कंपनी Nykaa यांच्यात असेल. देशातील ब्युटी अँड पर्सनल केअर मार्केट 16 अब्ज डॉलर्स किमतीचा आहे आणि ते वेगानेही वाढत आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची देखील देशात 400 हून अधिक ब्युटी स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. असे पहिले स्टोअर पुढील महिन्यात मुंबईत सुरू होऊ शकते.
टाटा समुहाचं टार्गेट 18 ते 45 वयोगटातील तरुण वर्ग आहे, जो एस्टी लॉडरचे M.A.C आणि बॉबी ब्राउन सारखे उच्च श्रेणीचे ब्रँड खरेदी करू शकतात. कंपनी द ऑनेस्ट कंपनी, एलिस ब्रुकलिन आणि गॅलीनी सारख्या परदेशी कंपन्यांशी हातमिळवणी करू शकते. रिपोर्टनुसार, टाटा आपल्या स्टोअरसाठी विशेष उत्पादने पुरवण्यासाठी दोन डझनहून अधिक कंपन्यांशी चर्चा करत आहे. टाटा स्टोअरमध्ये व्हर्च्युअल मेकअप किऑस्क आणि डिजिटल स्किन टेस्टचा वापर केला जाईल आणि त्यावर आधारित, ग्राहकांना प्रीमियम सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यासाठी ऑफर दिली जाईल.
कधी सुरू होणार स्टोअर?टाटांनी रॉयटर्सच्या रिपोर्टवर भाष्य करण्यास नकार दिला. द ऑनेस्ट कंपनी, एलिस ब्रुकलिन आणि गॅलीनी यांनी देखील टिप्पणी करण्यास नकार दिला. रिलायन्सनेही यावर भाष्य केलेले नाही. टाटाने अलीकडेच टाटा CLiQ पॅलेट हे ब्युटी शॉपिंग अॅप लाँच केले आहे. कंपनी आधीच रिटेल व्यवसायात आहे. त्याचे Zara आणि Starbucks सारखे जागतिक ब्रँडसह संयुक्त उपक्रम आहेत. अहवालानुसार, ब्युटी स्टोअर्समधील 70 टक्के उत्पादने स्किनकेअर आणि मेकअपची असतील. टाटाचे पहिले ब्युटी स्टोअर मार्चमध्ये सुरू होऊ शकते.