Join us

कर्तृत्ववान व्यक्तिमत्व! सासऱ्यांचा पावलावर पाऊल, केपी सिंह बनले रिअल इस्टेट 'हिरो'! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 5:38 PM

डीएलएफ हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर टोलेजंग इमारती उभ्या राहतात. भारतातील सर्वात मोठी तसेच रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये डीएलएफचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. या कंपनीला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यामागे कुशपाल सिंह यांचं मोठं योगदान आहे.

Success Story: भारत देश स्वतंत्र्य होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. साधारणत: १९४६ साली चौधरी राघवेंद्र सिंह यांनी दिल्ली लॅंड  अ‍ॅंड फायनान्स नावाच्या कंपनीची सुरुवात करण्याचा विडा उचलला. प्रारंभीच्या काळात त्यांनी दिल्लीत रेसिडेंशिअल तसेच कमर्शिअल प्रॉपर्टीजचा विस्तार केला. गुरुग्राममध्ये एक नवं शहर स्थापन करण्याचा निर्धार केला. चौधरी राघवेंद्र सिंह यांच्या कंपनीच्या यशामागे त्यांचे जावई कुशपाल सिंह यांचा मोलाचा वाटा आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांची यशोगाथा...

जगातील टॉप लिस्टेड कंपन्यांच्या यादीत डीएलएफ नाव आदराने घेतलं जातं. सध्या या कंपनीचा सगळा कारभार हा केपी सिंह यांचे चिरंजीव राजीव सिंह यांच्या हातात आहे. पाहायला गेल्यास मागील ५० वर्ष या बलाढ्य एम्पायरची सुत्रे केपी सिंह यांनी यशस्वीरित्या हाकलली. गुरुग्रामसारख्या शेतकऱ्यांनी गजबजलेल्या भागाचा कायापालट त्यांनी केला. 

या शहराचा आजवर झालेला विकास हे डीएलएफच्या यशाचं रहस्य म्हणावं लागेल. कंपनीने शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र विकसित केलं. त्याच्या प्रकल्पांमध्ये डीएलएफ सायबर सिटी, DLF Emporio, डीएलएफ प्राइम टॉवर्स यांचा समावेश आहे. हे सर्व शक्य करण्यामागे एकच माणूस होता, ती व्यक्ती म्हणजे केपी सिंह होते.

केपी सिंह हे मूळचे बुलंदशहरचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण येथील मदरशात झाले. यानंतर त्यांनी इंग्लंडमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले.१९६१ मध्ये सिंह यांनी लष्करी सेवेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मोटर्स आणि बॅटरीज बनवण्याच्या व्यवसायात प्रवेश केला. 

आपल्या कुटुंबाच्या सांगण्यावरून, १९७५ मध्ये त्यांनी डीएलएफ कंपनीची पुन्हा उभारणी करण्याचे काम हाती घेतले. त्याची पायाभरणी त्यांचे सासरे चौधरी राघवेंद्र सिंग यांनी १९४६ मध्ये केली होती. या कंपनीने फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांसाठी दिल्लीत २१ वसाहती तयार केल्या होत्या. १९७५ मध्ये कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती. मात्र, केपी सिंह यांनी ते होऊ दिलं नाही.

एकूण संपत्ती किती?

केपी सिंह यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान लोकांकडून जमीन खरेदी करण्याचे होते. कारण त्यांच्याकडे यासाठी पैसे नव्हते. मात्र, जनतेचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले. यामुळे त्यांनी डीएलएफला मोठ्या उंचीवर नेले. कंपनीने गुरुग्राममध्ये अनेक प्रकल्प तयार केले. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार केपी सिंह जगातील अब्जाधीशांच्या यादीत २९९ व्या स्थानी आहेत. केपी सिंह यांची एकूण संपत्ती ७६३ अब्ज डॉलर्स आहे.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी