Join us

भावाकडून ५००० उसने घेत सुरू केला व्यवसाय; बनले १७००० कोटींचे मालक; वाचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 3:31 PM

एकेकाळी उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या रामचंद्रन यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Success Story : तुमच्या अंगी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. ज्योती लॅब कंपनीचे मालक एम.पी.रामचंद्रन यांनी अतिशय खडतर प्रवासातून कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. एकेकाळी उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या रामचंद्रन यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

"आया नया उजाला, चार बूंदो वाला..."  उजाला निलची ही जाहिरात ९० च्या दशकात  लोकांच्या तोंडपाठ असायची. या उजाला नील कंपनीचे मालक एम.पी.रामचंद्रन यांचा उद्योगजगतातील प्रवास नव-उद्योजकांच्या स्वप्नांना नक्कीच बळ देईल. उधारीच्या ५००० हजार रुपयांमध्ये त्यांनी आपल्या व्यवयासाचा श्रीगणेशा केला. सध्याच्या घडीला या कंपनीची मार्केट व्हॅल्यू १७ हजार कोटी इतकी आहे.

उसने पैसे घेत केली सुरूवात -

रामचंद्रन यांचा उद्योगजगतातील प्रवास फार काही सोपा नव्हता. आपलं पोस्ट ग्रॅज्यूएशनचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम केलं. हे काम करत असताना  हळूहळू एम.पी.रामचंद्रन यांची व्यवसायात रुची वाढू लागली. त्यामुळे रामचंद्रन यांनी व्यवयास करण्याचं  ध्येय उराशी बाळगलं. आपल्या भावाकडून ५००० हजार रूपये उसने  घेत त्यांनी ज्योती लॅबोरेटरीज नावाची कंपनी उभी केली. उजाला नील नावाच्या ब्रॅडची स्थापना करत या उद्योजकाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

अशी सुचली उजाला ब्रॅंडची कल्पना -

सुरूवातीला रामचंद्रन यांना कपड्यांसाठी व्हाइटनर बनवायचा होता. त्यासाठी स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग ते करत असत. कपडे धुताना जांभळ्या रंगाचा वापर केल्याने कपडे पूर्वीपेक्षा जास्त शुभ्र दिसू लागतात. असा लेख त्यांनी एका दिवशी एका मॅगझीनमध्ये वाचला. जवळपास वर्षभर प्रयोग केल्यानंतर ते निष्कर्षापर्यंत पोहचले. या कल्पनेतूनच उजाला नीलची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

लाडक्या लेकीच्या नावाने ठेवलं कंपनीचं नाव- 

आपल्या भावाकडून उसने पैसे घेतल्यानंतर १९८३ मध्ये एम.पी.रामचंद्रन यांनी केरळमधील त्रिशुर येथे आपल्या मालकीच्या जमिनीत छोटी फॅक्टरी सुरू केली. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या नावाने या कंपनीचं ठेवलं. अगदी प्रारंभीच्या काळात  ६ महिलांच्या मदतीने हे उत्पादन त्यांनी घरोघरी जाऊन विकायला चालू केलं. त्यानंतर उजाला ब्रॅंड अल्पावधीत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. या नीलचा उपयोग पांढऱ्या रंगाचे कपडे चमकदार बनण्यासाठी केला जाऊ लागला. त्यामुळे ज्योती लॅबोरेटरिजची दोन महत्वाची उत्पादनं 'उजाला लिक्विड व्हाइटनर' आणि  'मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट्स' या उत्पादनांची देशात प्रचंड मागणी वाढली. 

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी