Success Story : आयुष्यात सर्व काही मिळवलं तरी माणूस न जमलेल्या गोष्टींबद्दल खंत करत राहतो. हे अनेकांच्या बाबतीत होतं. पण माणसाचा स्वभावच तो, असं म्हणून ते स्वतः आणि इतर लोकही त्याकडे दुर्लक्ष करतात. पण, मुंबईतील चीनू काला यांसारखी खूप कमी माणसं असतील, जी राहिलेल्या गोष्टींबद्दल फक्त खंत न बाळगता आयुष्य जेव्हा संधी देईल तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलतात.
मुंबईच्या पोरीने केली कमाल-
सध्याच्या घडीला मुंबईत राहणाऱ्या चीनू काला यांच्याकडे एक यशस्वी उद्योजिका म्हणून पाहिलं जातं. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आपलं राहतं घर सोडलं. सोबत अवघे ३०० रुपये आणि काही कपडेच होते. कौटुंबिक समस्येच्या गर्तेतून स्वत: ची सुटका करत त्यांनी परिस्थितीसमोर न झुकण्याचा प्रण केला. काय होईल? कसं होईल? याची काहीच कल्पना नव्हती. रेल्वे स्टेशन्स असो अथवा फुटपाथ असो त्या ठिकाणी झोपून त्यांनी दिवस काढले. डोक्यावर छत्र नसतानाही त्या डगमगल्या नाहीत. पण आपल्या स्वप्नांना मुठमाती न देता मोठ्या जिद्दीने आपली स्वप्ने या उद्योजिकेने सत्यात उतरवली.
आपल्या घरचा प्रपंच सुरळीत चालावा यासाठी चीनू काला यांनी दारोदारी जाऊन चाकू-सुरी विकण्याचं काम केलं. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्या घर चालवत असत. दिवसाला अवघे २० ते ४० रुपये इतकी कमाई करणारी मुलगी एक यशस्वी बिझनेसवूमन होईल, याची कोणी कल्पनाच केली नसेल. त्यांचा उद्योग जगतातील खडतर प्रवास वाचून या क्षेत्रात पाय रोवणाऱ्या नवख्या तरुणांना नक्कीच बळ मिळेल.
अशी झाली व्यवसायिक प्रवासाला सुरूवात-
२०१४ मध्ये चीनू गाला यांच्या व्यवसायिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एका छोट्याश्या मॉलमध्ये त्यांनी रुबंस एक्सेसरीजची पहिली ब्रांच उघडली. चीनू काला यांच्या अथक प्रयत्नाने आणि मेहनतीने रुबंस एक्सेसरीजने मार्केटमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला रुबंस एक्सेसरीजला ४० कोटी इतका वार्षिक टर्नओव्हर असल्याचं सांगितलं जातं. शिवाय १० लाखाहून अधिक एक्सेसरीज विकण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.
पैसा, प्रसिद्धी मिळाली असली तरी चीनू काला या सर्वसामान्य लोकांसोबत जोडलेल्या आहेत. आपला मुलगा आणि पतीसह त्या एका अलिशान बंगल्यामध्ये राहत आहेत. आपल्या ज्वेलरी ब्रॅडला मोठं करण्यासाठी १५-१५ तास काम करतात. रुबंसला भारतीय फॅशन ज्वेलरी मार्केमध्ये २५ टक्के हिस्सेदारी मिळावी, असं त्याचं स्वप्न आहे.