Success Story : सध्या पेटीएमच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस घसरण पाहायला मिळते आहे. भारतीय रिजर्व बॅंकेने २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅग इत्यादींमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यास मनाई केली. त्यामुळे पेटीएमला मोठा झटका बसला. पण ही कोट्यवधींची कंपनी कोणी उभी केली? त्यामागचा कंपनीचा प्रवास, आपण जाणून घेणार आहोत.
विजय शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगढमधील एका छोट्याश्या गावामध्ये झाला. एका गरीब कुटुंबातील मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून यशाच्या सर्वोच्च शिखराला गवसणी घातली. त्यांचा हा प्रवास असंख्य तरुण-तरुणींना प्रेरणा देणारा आहे. अगदी लहानपणापासूनच विजय शर्मा यांनी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात बाळगली होती. त्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. परिस्थिती समोर शरण नं जाता लढण्याची वृत्ती हे त्यांच्या यशाचं प्रमुख कारण आहे.
भाषेवरुन हिणवण्यात आलं :
विजय शर्मा यांच सुरुवातीच शिक्षण अलीगढच्या हरदुआगंज या छोट्याश्या गावातील हिंदी माध्यमाच्या शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. याआधी त्यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमात झालं होतं. त्यामुळे इंग्रजी भाषेची इतकी जाण नव्हती. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलता येत नसल्याने बऱ्याचदा त्यांची थट्टा करण्यात आली.
काही मित्रांच्या मदतीने विजय शर्मा इंग्रजी बोलायला शिकले. लहानपणापासून हिंदी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतल्याने बड्या इंग्रजी माध्यमांच्या कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांची इंग्रजी बोलताना त्यांची फजिती व्हायची त्याबद्दल ते दिलखुलासपणे बोलताना देखील दिसतात. पण एवढ्यावरच नं थांबता त्यांनी इंग्रजीत बोलण्याचा निर्धार केला आणि काही दिवसांमध्येच त्यांना इंग्रजीत संवाद साधता येऊ लागला.
पेटीएमचा प्रवास : साधारणत: १९९७ मध्ये विजय शर्मा यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना indiasite.net नावाच्या एका वेबसाईटची सुरुवात केली. त्यानंतर २००० मध्ये one97 communication ltd ही नवी कंपनी तयार केली. त्यावर जोक्स, रिंगटोन्स आणि स्पर्धा परीक्षांचे रिझल्ट दाखवले जायचे. एका भाड्याच्या खोलीत त्यांनी व्यवसााचा श्रीगणेशा केला. त्यानंतर विजय शर्मा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
दिल्लीमध्ये वास्तव्यास असताना विजय शर्मा हे सुट्टीच्या दिवशी बाजारात फेरफटका मारायचे. त्या दरम्यान बाजारातून फॉर्च्यून आणि फोर्ब्स मॅग्जिन खरेदी करायचे. यावेळी त्यांनी एका जुन्या मासिकात एका व्यावसायिकाची यशोगाथा वाचली. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या गॅरेजमधून कंपनी कशी सुरू केली आणि ती यशस्वी कशी केली हे या कथेत सांगितले होते. या कथेचा विजय शर्मा यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.