Success Story : माणसाला जीवन जगताना कष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. मनामध्ये जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला माणूस धीटपणे तोंड देऊ शकतो.
बिहारमधील शैलेश कुमार नावाच्या एका उद्योजकाने नवा आदर्श तरुण पीढीसमोर ठेवलाय. CABT लॉजिस्टिक कंपनीची स्थापना करून त्यांनी अनेकांना प्रेरणा देण्याचं काम केलंय. प्रारंभीच्या काळात पदरी अपयश आलं तरीही न डगमगता त्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एका यशस्वी लॉजिस्टिक कंपनीची उभारणी केली. असंख्य अडचणींवर मात करत या उद्योजकाने व्यवसायिक क्षेत्रात स्वत: दबदबा निर्माण केला आहे.
बिहारच्या समस्तीपुर हे छोट्याश्या ठिपक्या ऐवढं त्याचं गाव आहे. या गावातच शैलेश कुमार यांचं बालपण गेलं. साधारणत: २०१८ मध्ये त्यांनी CABT लॉजिस्टिक क्षेत्रात पाऊल ठेवलं. सुरूवातीला शैलेश कुमार यांनी अनेक चढ-उतार पाहिले. आता सध्याच्या घडीला त्यांची कंपनी करोडोंची उलाढाल करते.
पार्श्वभूमी-
शैलेश कुमार यांचा जन्म साल १९८६ मध्ये झाला. त्यांच्या कुटुंबात पाच लोक होते. त्यांच्यासोबतच शैलेश यांच बालपण एका लहानश्या खोलीत गेलं. अगदी लहान वयातच त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं होतं. अवघ्या १,४०० रुपयांच्या पगाराच त्यांच्या वडिलांना घर चालवावं लागायचं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शैलेश कुमार यांनी दिवस काढले. भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची संघर्षमय कहाणी ऐकत त्याचं बालपण गेल्याचं ते सांगतात.
आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शैलेश यांनी पुढील शिक्षणासाठी कोटा शहराची वाट धरली. आय आय टी प्रवेशसाठी शैलेश कोटा शहरात राहायला गेले पण त्यातही त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंचे धडे गिरवायला सुरूवात केली. वडिलांचा सल्ला घेत शैलेश कुमार यांनी पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. २०११ मध्ये ते बीटेक पास झाले. त्यानंतर GATE ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्यातही पदरी निराशा आली. कमी मार्क्समुळे त्यांना पुन्हा प्रयत्न करावा लागला.
अशी सूचली कल्पना-
जबाबदारीचं ओझं पेलताना हाती उत्पन्नाचं साधन निर्माण करणं हा मोठा टास्क त्यांच्यापुढे होता. त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी फ्लिपकार्ट कंपनी जॉईन केली, तिथे त्यांनी डिलिव्हरी बॉयचं काम केलं. त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शैलेश कुमार यांनी वर्षभरातच आपल्या लॉजिस्टिक कंपनीची स्थापना केली. त्यानंतर २०१९-२० मध्ये कंपनीचं वार्षिक उत्पन्न १.७ कोटी इतकं होतं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने १५९.२२ कोटी रुपयांची उलाढाल केली.
अगदीच व्यवसाय सावरत असतानाच शैलेश यांनी काही मोजक्या शहरांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. सध्या २३ राज्यांमध्ये २,००० कर्मचारी आणि १२,००० पिन कोड कवर करणाऱ्या मोठ्या लॉजिस्टिक नेटवर्कसोबत ते काम करतात. कंपनी दिवसाला २० लाखाची ऑर्डरची पूर्तता केली जाते. पाहायला गेल्यास CABT लॉजिस्टिक कंपनीच्या यशांचं श्रेय फक्त आणि फक्त शैलेश कुमार यांना जातं.