नवी दिल्ली : देशातील फुटविअर क्षेत्रानेही मोठी झेप घेतली आहे. भारतीय पायताण उद्योगाने चीनवर मात केली असून, चिनी पायताणांची आयात ५ टक्क्यांवर आली आहे. भारताची चपला आणि जोड्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली असून ६५ देशांमध्ये उत्पादने पाठविली जातात. यावर्षी सुमारे ५ अब्ज डॉलर्स एवढी या क्षेत्राची निर्यात राहण्याचा अंदाज आहे.
भारताच्या पायताण उद्योगातील यशात कोल्हापूरसह हरियाणातील बहादूरगढ तसेच उत्तर प्रदेशातील आग्र्याचा सिंहाचा वाटा आहे. ॲक्शन, रिलॅक्सो, ॲरोबिक, ॲक्वालाइट, टुडे आणि सुमंगलम फुटविअर यांसारख्या अनेक नामवंत कंपन्या बहादूरगढमध्ये उत्पादन करतात. तर कोल्हापूर आणि आग्र्यामध्ये चामड्याच्या चपला आणि जोड्यांचे प्रामुख्याने उत्पादन होते.
असा होतो खर्च कमी
भारत, आफ्रिका आणि खाडी देशांतील लोकांच्या पायांची बनावट एकसारखी आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारासाठी बनवलेले चप्पल-बुटांची या देशांत थेट निर्यात हाेते. वेगळे साचे बनविण्याची गरज पडत नाही. त्यामुळे खर्चात कपात होऊन लाभ होतो.