नवी दिल्ली : स्वबळावर अब्जाधीश (सेल्फ-मेड बिलेनिअर) बनलेल्या टॉप-१० महिलांच्या जागतिक यादीत भारताच्या फाल्गुनी नायर यांचा समावेश झाला आहे. नायकाच्या संस्थापक असलेल्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती ७.६ अब्ज डॉलर आहे. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने ही यादी जारी केली आहे.
टॉप-१० मध्ये स्थान मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत.
५८ वर्षीय फाल्गुनी नायर या यादीत १० व्या स्थानावर आहेत. फाल्गुनी नायर यांनी अलीकडेच बायोकॉनच्या प्रमुख किरण मुजुमदार यांना मागे टाकून भारतातातील सर्वाधिक श्रीमंत सेल्फ-मेड महिला होण्याचा मान मिळविला होता. नायका ही युनिकॉर्न कंपनी असून, गेल्या वर्षी तिची शेअर बाजारात सूचीबद्धता झाली होती. हुरूनचे चेअरमन रुपर्ट हुगेवर्फ यांनी जारी केलेल्या अहवालानुसार, जगात केवळ १२४ सेल्फ-मेड अब्जाधीश महिला आहेत. गंमत म्हणजे जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा आणि कोरिया या देशांतील एकही महिला या यादीत नाही. मागील दशकात सेल्फ-मेड अब्जाधीश महिलांची संख्या तिप्पट झाली आहे. हुरूनच्या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळविणाऱ्या महिलांत जगप्रसिद्ध मॉडेल तथा ‘केकेडब्ल्यू ब्युटी’च्या मालकीण किम कर्दाशियान यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर आहे.
या भारतीय महिलाही आघाडीवर
n हुरूनच्या या यादीत फाल्गुनी नायर यांच्या व्यतिरिक्त किरण मुजुमदार शॉ आणि जोहोच्या सहसंस्थापक राधा वेंबू यांचा समावेश आहे.
n राधा वेंबू या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक श्रीमंत सेल्फ-मेड महिला आहेत. त्यांची संपत्ती ३.९ अब्ज डॉलर आहे. भारतीय वंशाच्या मात्र कॅलिफोर्नियात राहणाऱ्या नेहा नारखेडे यांचाही यादीत समावेश आहे. त्यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलर आहे.
वू याजून जगातील सर्वाधिक श्रीमंत
बीजिंगच्या प्रॉपर्टी डेव्हलपर वू याजून (वय ५८) या जगातील सर्वाधिक श्रीमंत सेल्फ-मेड महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती १७ अब्ज डॉलर आहे. विशेष म्हणजे टॉप-१० च्या यादीत पहिल्या ७ महिला चीनच्याच आहेत.