Join us

Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्घटना, दोघे ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 6:24 AM

रतन टाटा यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर सायरस यांनी २०१२ ते २०१६ या काळात टाटा उद्योगसमूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. शापूरजी पालनजी उद्योगाकडे टाटा सन्सचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत.

कासा/पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या. रतन टाटा यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर सायरस यांनी २०१२ ते २०१६ या काळात टाटा उद्योगसमूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. शापूरजी पालनजी उद्योगाकडे टाटा सन्सचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. मात्र सायरस तेव्हा फार प्रसिद्धीच्या झोतात नसल्याने अनेकांना त्यांच्या निवडीनंतरच त्यांच्या कामाची ओळख पटली. पुढे मतभेद झाल्याने त्यांना पदावरून दूर केले होते.  

कसा झाला अपघात?-  रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते अहमदाबादवरून मर्सिडिजने मुंबईला येत होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. -  चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवर बांधलेल्या नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या भिंतीला धडकली. ही दुर्घटना एवढी भीषण होती, की मिस्त्री बसलेल्या भागाच्या दिशेने समोरून गाडीचे प्रचंड नुकसान झाले. -  एअर बॅग असूनही जोरदार धडकेमुळे मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चार प्रवाशांपैकी सायरस मिस्त्री व जहांगीर दिनशा पंडोल यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अनायता पंडोल व डेरियल पंडोल हे दोघे गंभीर जखमी झाले. मिस्त्री, जहांगीर यांच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. 

सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते व्यापारी नेते होते. त्यांच्या जाण्याने उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्त्व होते. या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

स्त्रीरोगतज्ज्ञ अनायता अपघातात जखमी -  अपघातात जखमी झालेल्या अनायता या प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ असून, होर्डिंगविरोधात लढा देणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. -  त्या मिस्त्री कुटुंबाच्या मित्रपरिवारातील आहेत, तर डेरियल पंडोल हे जे. एम. फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत.  

टॅग्स :सायरस मिस्त्रीटाटारतन टाटाव्यवसायअपघात