China Jack Ma : चीनमधील सर्वात प्रसिद्ध आणि एकेकाळचे सर्वात प्रभावशाली उद्योजक जॅक मा अखेर पाच वर्षांनंतर जगासमोर परतले. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलीबाबाचे संस्थापक जॅक मा 2020 पासून गायब झाले होते. त्यांच्या गायब होण्याचे कारण म्हणजे, चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर त्यांनी केलेली उघड टीका होती. यानंतर सरकारने त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली आणि जॅक मा यांनी सार्वजनिक जीवनापासून स्वतःला दूर केले. मात्र, आता त्यांचे पुनरागमन अनेक नवे संकेत देत आहेत. चीनी सरकार आणि खाजगी क्षेत्रतील सलोख्याचे हे लक्षण आहे की, नवीन रणनीती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शी जिनपिंग यांच्यासोबत दिसलेजॅक मा गेल्या आठवड्यात पाच वर्षांनंतर चीनच्या उच्च उद्योजक आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत सार्वजनिकपणे दिसले. या बैठकीला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही उपस्थित होते. जॅक मा यांनी भाषण दिले नसले तरी ते समोरच्या रांगेत बसलेले छायाचित्रांमध्ये दिसले. चीन सरकार आता खासगी क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे लक्षण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. सोशल मीडियावर जॅक माच्या पुनरागमनाला सकारात्मक बदल म्हणून पाहिले जात आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राबाबत सरकारची भूमिका बदलणार?या बैठकीत शी जिनपिंग म्हणाले की, खाजगी क्षेत्राने आता उघडपणे पुढे येऊन चीनच्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योगदान दिले पाहिजे. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा चीनची अर्थव्यवस्था मंदावली असून, बेरोजगारी सातत्याने वाढत आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वासही कमकुवत होत आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचा वाटा 50% पेक्षा जास्त असून, ते शहरी रोजगार आणि कर उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. जॅक माच्या पुनरागमनावरून असे दिसून येते की, चीन सरकार आता तंत्रज्ञान कंपन्या आणि खाजगी क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांना पुन्हा प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. या वृत्तानंतर अलिबाबाच्या शेअर्समध्येही वाढ झाली, जी बाजाराची सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवते.
या निर्णयाचा अमेरिकेशी संबंध?बीबीसीच्या वृत्तानुसार, चीन सरकारचे हे नरमाईचे धोरण अमेरिकेच्या वाढत्या आर्थिक निर्बंधांचा परिणाम असू शकते. अलीकडेच, चीनची Ai कंपनी DeepSeek ने आपले नवीन Ai तंत्रज्ञान 'R1' लॉ्च केले, ज्यामुळे अमेरिकन टेक कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चीनला आता सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्रीन एनर्जीसारख्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे चीनला आपल्या कंपन्यांवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत जॅक मा सारख्या अनुभवी उद्योजकांची गरज वाढली आहे.
तज्ज्ञांचे वेगळे मतजॅक माच्या पुनरागमनाकडे सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात असले तरी काही तज्ज्ञांचे मत आहे की, ते आता पूर्वीसारखे स्वतंत्र राहणार नाहीत. चीनी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या उपस्थितीला फारसे कव्हरेज दिले नाही, ज्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, सरकार अजूनही त्यांना पूर्णपणे खुले व्यासपीठ देण्याच्या मन:स्थितीत नाही. याचा अर्थ चिनी तंत्रज्ञान कंपन्यांना विकास करण्याची परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार काम करावे लागेल. आता पुढे चीन सरकार कशाप्रकारचे निर्णय घेणार, धोरणे आखणार, हे पाहणे महत्वाचे आहे.