मुंबई, दि. 13 - सुमारे अडीच हजार कोटीचे कर्ज बुडवून पलायन केलेल्या वरुण इंडस्ट्रीजचा सहप्रवर्तक कैलाश अगरवाल याला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. दुबईहून भारतात परतला असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला पकडण्यात आले असून त्याच्याकडून बॅकांतील गैरप्रकार व फरारी सहकारी किरण मेहता बद्दल माहिती घेण्यात येत असल्याचे सीबीआयचे प्रवेक्त आर.के. गौर यांनी सांगितले.वरुण इंडस्ट्रिज ही देशातील सर्वाधिक कर्जबुडव्यापैकी एक असून गेल्या काही महिन्यापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होती.स्टेनलेस स्टीलच्या उद्योगातील अग्रवाल आणि मेहता यांनी इंडियन बँक आॅफ इंडियाची ३०० कोटी रु पयांचा फसवणूक केली. अन्य बँकांच्या कंसोर्टियमला आणखी १५०० कोटींचा गंडा घातला आहे. त्यामध्ये सेंट्रल बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनायटेड बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, यूको बँक, एआरसीआयएल (आयडीबीआय बँक) आणि अलाहाबाद बँकांकडून २००७ ते २०१२ या कालावधीत हे कर्ज उचलेले आहे. २०१३ मध्ये त्यांना बेकायदेशीर ठरविण्यात आले त्याशिवाय अन्य खासगी सावकारांकडूनही १०० कोटीचे कर्ज उचलले होते. त्यांच्या विरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अवैध मिळकत, कर्जबुडवेगिरी व मनी लॅण्डीग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.