Join us  

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं Dubai मधील आजवरचं सर्वात महागडं घर, पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 12:36 PM

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबाने दुबईत समुद्राजवळ एक आलिशान व्हिला विकत घेतल्याचे वृत्त आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी एक मोठा करार केला आहे. मुकेश अंबानी हे दुबईतील बीच साइड व्हिला खरेदी केल्याचे वृत्त आहे. या व्हिलाची किंमत 80 मिलियन डॉलर्स (6,396,744,880 रूपये) आहे. मुकेश अंबानी हे या शहरातील सर्वात मोठे निवासी मालमत्ता खरेदीदार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पाम जुमेरा बीचवरील ही मालमत्ता या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्यासाठी खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्यांचा हा व्हिला पाम-आकाराच्या कृत्रिम द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील भागात स्थित आहे. यात 10 बेडरूम, एक खाजगी स्पा, इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत. गेल्या काही काळापासून अल्ट्रा रिच समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी दुबई एक पसंतीची बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. तेथील सरकारने दीर्घकालीन गोल्डन व्हिसा देऊन आणि परदेशी लोकांना घरे खरेदी करण्यासाठीचे निर्बंध कमी करून आकर्षित केले आहे. तर ब्रिटीश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि बॉलीवूड मेगास्टार शाहरुख खान सारखे दिग्गज अंबानींचे नवे शेजारी असतील.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार अनंत अंबानी हे अंबानींच्या संपत्तीच्या तीन वारसांपैकी एक आहेत. जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले 65 वर्षीय मुकेश अंबानी हळूहळू आपल्या व्यवसायाची धुरा आपल्या मुलांकडे सोपवत आहेत. रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंब परदेशात आपल्या रिअल इस्टेटचा विस्तार करत आहे.

युकेमध्ये आकाश अंबानींचं घर

गेल्या वर्षी, रिलायन्सने यूकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेड खरेदी करण्यासाठी 79 मिलियन डॉलर्स खर्च केले. यात जॉर्जियन काळातील हवेली आहे, जी मोठा मुलगा आकाश अंबानींसाठी विकत घेतली होती. आकाश अंबानी यांची अलीकडेच रिलायन्सची दूरसंचार कंपनी Jio Infocomm Ltd च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी आकाशची बहीण ईशा अंबानी न्यूयॉर्कमध्ये घराच्या शोधात आहे असल्याचंही वृत्त आहे.

असा मिळतो १० वर्षांचा व्हिसा

पाम जुमेरा बेटांवर आलिशान हॉटेल्स, आलिशान क्लब, स्पा, रेस्टॉरंट्स आणि आलिशान अपार्टमेंट टॉवर आहेत. त्याचे बांधकाम 2001 मध्ये सुरू झाले आणि 2007 च्या आसपास लोकांनी तेथे वास्तव्यास सुरूवात केली. दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटचा अर्थव्यवस्थेत एक तृतीयांश वाटा आहे. नवीन नियमांनुसार, गुंतवणूकदारांनी किमान 20 लाख दिरहम किमतीची मालमत्ता खरेदी केल्यास त्यांना 10 वर्षांचा व्हिसा मिळू शकतो.

टॅग्स :मुकेश अंबानीदुबईरिलायन्स