Join us  

पोटासाठी दूध विकलं, परदेशात जाऊन बनला २० हजार कोटींच्या कंपनीचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:34 PM

अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Rizwan Sajan Founder Danube Group Success Story : मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या  रिजवान साजन यांनी  उद्योग क्षेत्रामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. एक यशस्वी भारतीय व्यवसायिक म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज २० हजार कोटींचे ते मालक बनले आहेत. भारतात उद्योगाचा विस्तार तर केलाच पण परदेशातही त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नोकरीसाठी ते मुंबई सोडून परदेशात गेले आणि मेहनतीच्या जोरावर स्वबळावर आपले साम्राज्य उभे केले. 

कठीण काळात संघर्ष केला...

रिजवान साजन यांनी सुरूवातीच्या काळात दूधाची डिलिव्हरी काम केले होते असे ते सांगतात. शिवाय त्यांनी रस्त्यावर पुस्तके देखील विकली. पण परिस्थितीसमोर हतबल न होता संघर्ष करत त्यांनी दुबईत उद्योग स्थापित केला. रिजवान साजन यांचा जन्म मुंबईचा. त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी सेल्समन म्हणून काम केले. आज त्यांचे नाव दुबईतील सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीयांच्या यादीत घेतले जाते.  डॅन्यूब समूह समूहाचे रिजवान मालक आहेत, डॅन्यूब समूह हा संयुक्त अरब अमिरात, ओमान, बहरीन, सौदी अरेबिया, कतार आणि भारतासह जगभरातील सर्वात मोठ्या बांधकाम साहित्याचे निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.

उद्योजक बनण्याचा प्रवास :

अगदी लहान असतानाच रिजवान यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर संघर्षाच्या काळात रिजवान यांनी रस्त्यावर पुस्तके विकली. इतकेच नाहीतर आपल्या कुटुंबासाठी त्यांनी दूध विकण्याचे काम केले. १९८१ मध्ये त्यांनी कुवेतमध्ये त्यांच्या काकांच्या बांधकाम साहित्याच्या दुकानात काम केले. सेल्समन म्हणून काम करत रिजवान यांनी आपला प्रवास सुरू केला.

१९९३ मध्ये डॅन्यूब या कंपनीची स्थापना केली. अपार मेहनत आणि प्रामाणिकपणे कष्ट करत रिजवान यांनी आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. आजच्या घडीला डेन्यूब समुहाचे रिअल इस्टेट क्षेत्रात आदराने नाव घेतले जाते. डॅन्यूब समूहाने २०१९ मध्ये १.३ अब्ज डॉलर इतकी वार्षिक उलाढाल केल्याचे सांगण्यात येते. डीएनए रिपोर्टनुसार, यूएईच्या अर्थ मंत्रालयाच्या वेबसाइटवर, रिझवान साजनची एकूण संपत्ती २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे २०,८३० कोटी रुपये इतकी आहे.

टॅग्स :व्यवसायदुबई