Join us

सोयीचंच नाही, तर समस्याही बनू शकते 'बाय नाऊ, पे लेटर'; ऑप्शन निवडण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 5:18 PM

महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण 'बाय नाऊ, पे लेटर'ची सुविधा वापरतात. पण कधीकधी ही सुविधा तुमची डोकेदुखीही ठरू शकते.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन सेल सुरू झाला आहे. या कंपन्या कपडे, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट देत आहेत. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी 'बाय नाऊ, पे लेटर'ची ('Buy Now, Pay Later') सुविधाही आहे. ही सेवा अनेकदा तरुण खरेदीदारांना आकर्षित करते कारण ती आधी खरेदी आणि नंतर पैसे देण्याचा पर्याय देते. पण ही सुविधा जितकी सोयीची दिसते तितकीच अडचणीही निर्माण करू शकते. याशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे.बाय नाऊ पे लेटर हे अल्प मुदतीच्या कर्जासारखे आहे. यामध्ये फायनान्स कंपन्या खरेदीसाठी कर्ज देतात. हा पर्याय खासकरून जे क्रेडिट कार्ड वापरत नाहीत त्यांच्यासाठी आहे. अशा परिस्थितीत तुमच्या खिशात पुरेसे पैसे नसले तरी तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. दरम्यान, कंपन्या तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी काही दिवसांचा अवधी देतात. ही रक्कम तुम्ही एकरकमी किंवा ईएमआयच्या स्वरूपात भरू शकता. जर तुम्ही वेळेवर पैसे भरले तर तुम्हाला कोणतेही व्याज द्यावं लागणार नाही. परंतु ठरावीक वेळेनंतर तुम्हाला यावर व्याजही द्यावं लागेल.केव्हा बनेल ही सुविधा समस्याबाय नाऊ पे लेटरची सुविधा अनेकजण अतिशय सोयीची मानतात, कारण वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशात एकत्र रक्कम नसेल तर तुम्हाला त्यावेळीही खरेदी करता येते. या सुविधेद्वारे, तुम्ही तुमची खरेदी करू शकता आणि रक्कम नंतर हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी ही रक्कम भरू शकता. परंतु जर तुम्ही हे पेमेंट निर्धारित कालावधीत भरलं नाही, तर बीएनपीएल कंपन्या तुमच्याकडून दंड आकारतात. तसंच, त्याचा रिपोर्ट क्रेडिट स्कोअर एजन्सींना दिला जातो आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. खराब क्रेडिट स्कोअरनंतर, भविष्यात कर्ज मिळण्यात खूप अडचण येऊ शकते.केव्हा वापरावी ही सुविधाबीएनपीएलच्या सुविधेचा लाभ घेत असताना, अनेक वेळा ग्राहक त्याच्या बजेटपेक्षा जास्त खर्च करतो आणि नंतर परतफेड करू शकत नाही. मग ही सुविधा त्यांच्यासाठी समस्या निर्माण करते. ही सुविधा देखील एक प्रकारचं कर्ज असल्यानं ज्यासाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन शुल्कही भरावं लागते. जोपर्यंत तुम्हाला मोठी गरज नाही तोपर्यंत अशा प्रकारचं कर्ज घेऊन खरेदी करणं टाळलं पाहिजे, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :खरेदीऑनलाइनपैसा