Join us  

‘आता खरेदी करा, पैसे नंतर द्या’ ट्रेंड सध्या जोरात; बाजारपेठ ५ वर्षांत ५ लाख कोटींवर जाण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 8:11 AM

देशात माेबाइल वाॅलेट पेमेंटद्वारे हाेणारे व्यवहार माेठ्या प्रमाणात वाढले असून, या क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानी पाेहाेचला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये ‘बाय नाऊ, पे लेटर’ म्हणजेच आता खरेदी करा, पैसे नंतर द्या, अशा तत्त्वावर खरेदी वाढली आहे. या खरेदीतून माेठ्या प्रमाणावर उलाढाल हाेत आहे. अनेक वित्त पुरवठा कंपन्या आणि बँकाही त्यात उतरल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या बाजारपेठेची उलाढाल येत्या पाच वर्षांमध्ये ५ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता आहे. 

भारतात माेबाइल वाॅलेट पेमेंटद्वारे हाेणारे व्यवहार माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. या क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानी पाेहाेचला आहे. काेराेना काळात ऑनलाइन शाॅपिंगचे महत्त्व आणि व्यवहार वाढले. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन माेबाइल वाॅलेट पेमेंट, तसेच ऑनलाइन शाॅपिंग कंपन्यांनी ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही संकल्पना आणली. त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या त्यात ३० ते ४० हजार काेटी रुपयांपर्यंत उलाढाल हाेत आहे.

याेजनेची गरज का? 

अनेक ग्राहकांकडे क्रेडिट कार्डसारख्या सुविधा नाहीत. अनेकांना तर ते मिळत नाही. बँकांमध्ये खाते आहे, मात्र डिजिटल वित्तीय सेवांपर्यंत त्यांची पाेहाेच नाही. अशांसाठी ही याेजना सुरू करण्यात आली. अशा ग्राहकांची सर्वप्रथम केवासी आणि सिबिल स्काेअरच्या आधारे ५ हजारांपासून ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट देण्यात येते. पैसे परत करण्यासाठी अनेक माेबाइल वाॅलेट तसेच ऑनलाइन शाॅपिंग कंपन्या ग्राहकांना २० ते ३० दिवसांची मुदत देतात.

मोबाइलवरून व्यवहार

भारतात स्मार्टफाेन आणि माेबाइल डेटाचा वापर अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये लाेकांकडून नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्डचा वापर जास्त हाेतो. मात्र, भारतात माेबाइलवरून आर्थिक व्यवहार करण्यावर लाेकांचा जास्त कल आहे. 

टॅग्स :व्यवसाय