Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने खरेदी महागणार! आयात कर १५ टक्क्यांवर; वित्तीय तूट वाढल्याचा परिणाम

सोने खरेदी महागणार! आयात कर १५ टक्क्यांवर; वित्तीय तूट वाढल्याचा परिणाम

मेमध्ये भारताने ६.०३ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा नऊपट अधिक आहे. भारतीय महिलांचा ओढा सोने खरेदीकडे वाढल्याचे यावरून पहायला मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:36 PM2022-07-02T15:36:24+5:302022-07-02T15:36:51+5:30

मेमध्ये भारताने ६.०३ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा नऊपट अधिक आहे. भारतीय महिलांचा ओढा सोने खरेदीकडे वाढल्याचे यावरून पहायला मिळते.

Buying gold will be expensive Import tax on 15 per cent; Consequences of widening fiscal deficit | सोने खरेदी महागणार! आयात कर १५ टक्क्यांवर; वित्तीय तूट वाढल्याचा परिणाम

सांकेतिक छायाचित्र

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा सोने महाग होणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात कर १०.७५ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के केला आहे. त्यामुळे पहिल्याचदिवशी सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅमला सुमारे २,५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

देशाच्या चालू खात्यातील तूट (कॅड) ३ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. ही वित्तीय तूट कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या व्यापारी तुटीस सोने आणि कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने कारणीभूत आहे. सोने आयात कमी करण्यासाठी करात वाढ करण्यात आली. ३० जूनपासून हा बदल अमलातही आला आहे. 

सोन्यावरील मूळ सीमा शुल्क ७.५ टक्के होते, ते वाढवून १२.५ टक्के करण्यात आले आहे. त्यावर २.५ टक्के ग्रामीण पायाभूत विकास उपकर (एआयडीसी) लागतो. त्यामुळे प्रभावी सीमा शुल्क १५ टक्के झाले आहे. बाजार मजबूत करण्यासाठी चीन, अमेरिका आणि सिंगापूर यांसारख्या काही देशांनी सोन्यावरील आयात शुल्क संपवले आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा वापरकर्ता देश आहे.

सरकारने का घेतला निर्णय? -
मे महिन्यात सोन्याची आयात अचानक वाढून १०७ टनांवर गेली. जूनमध्येही सोने आयात लक्षणीय राहिली. वाढत्या सोने आयातीचा चालू खात्यावरील दबाव वाढला होता. त्यातच रुपया घसरल्यामुळे सरकार चिंतित आहे. आयात कमी करून सरकार व्यापारी तूट कमी करू इच्छिते. त्याचप्रमाणे सोन्याची आयात कमी झाल्यास रुपयाही थोडासा मजबूत होऊ शकतो.

भारतातील सोन्याची मागणी प्रामुख्याने आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. आयात करातील वाढीनंतर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २,५०० रुपयांपर्यंत वाढू शकतो.
    - सुरेंद्र मेहता, सचिव, इंडियन बुलियन 
    गोल्ड असोसिएशनचे (आयबीजेए)

भारतीय महिला खऱ्या अर्थाने लक्ष्मी
मेमध्ये भारताने ६.०३ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा नऊपट अधिक आहे. भारतीय महिलांचा ओढा सोने खरेदीकडे वाढल्याचे यावरून पहायला मिळते. २०२१ मध्ये १ हजार टन सोन्याची आयात करण्यात आली होती. हा दशकातील उच्चांक आहे. गेल्यावर्षी सरकारने आयात कर घटवून ७.५ टक्के केला होता. आयात वाढण्याचे ते एक कारण होते. 
 

Web Title: Buying gold will be expensive Import tax on 15 per cent; Consequences of widening fiscal deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.