“भारत 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची (रु. 30 लाख कोटी) अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. तर 2030 पूर्वी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्याच वेळी, 2050 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,” असा विश्वास अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी व्यक्त केला. वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटंट्सला संबोधित करताना त्यांनी यावर वक्तव्य केलं. “भारत पुढील दशकात दर 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मध्ये 1 ट्रिलियन डॉलर्स जोडण्यास सुरूवात करेल,” असेही ते म्हणाले.
“अनिश्चिततेच्या काळात आपण या व्यासपीठावर भेटलो आहोत. कोरोना महासाथीच्या वेदना, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलाचे आव्हान आणि महागाईत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे जागतिक नेतृत्वासमोर संकट निर्माण झाले आहे,” असे अदानी म्हणाले. भारत आर्थिक महासत्ता बनत आहे. डेमोग्राफी, उद्योजकता आणि ऊर्जा क्षेत्रात येणारे बदल भारताला आर्थिक महासत्ता बनवतील. 2050 पर्यंत भारताचे स्टॉक मार्केट कॅपिटल 45 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हवामान बदल कराराचा फारसा उपयोग नाही“हवामान बदल कराराने जग बदलण्यात फारसे योगदान दिलेले नाही. COP 27 आणि त्याच्या मागील भागांनी जगाला अपेक्षित असलेला बदल घडवून आणू शकल्या नाहीत. मोठी आर्थिक शक्ती आणि कमांड अँड कंट्रोलच्या जुन्या संरचना आजच्या जगाचे व्यवस्थापन करू शकत नाहीत. आजच्या मल्टीपोलर जगात महासत्तेची व्याख्याच बदलली आहे. बहुस्तरीय जागतिक संकटाने महासत्तांच्या युनिपोलर किंवा बायपोलर जगाची मिथक मोडीत काढली आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
भारताचे यश अद्वितीय“आर्थिक विकास आणि लोकशाही या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन पुढे जाण्यात भारताचे यश अद्वितीय आहे. आजच्या जगात फक्त तोच देश महासत्ता असेल, जो शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासात जगासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी आपले तंत्रज्ञान सामायिक करण्यास तयार असेल. देशात करण्यात आलेल्या बॅलन्स्ड गव्हर्नन्स आणि सामाजिक-आर्थिक सुधारणांमुळे भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे,” असं अदानी म्हणाले.
एनर्जी पॉवर्टी हे विकसनशील जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भारतातील ऊर्जा क्षेत्रात होणारे बदल हे अद्वितीय असतील. पुढे जाऊन, भारताच्या बहुतांश ऊर्जेच्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जातील. अदानी समूह जगातील सर्वात मोठी एकात्मिक अक्षय ऊर्जा मूल्य साखळी तयार करेल. जगातील ऊर्जा क्षेत्रातील बदलांमुळे अनेक दशकांपर्यंत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले.