Biggest Crypto Heist : कॉल लावल्यानंतर ऐकू येणाऱ्या सायबर गुन्ह्याच्या सूचनांमुळे तुम्ही देखील कंटाळला आहात का? पण, हे किती आवश्यक आहे, हे रोज घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरुन लक्षात येईल. दिवसभरात फसवणुकीच्या हजारो तक्रारी सायबर सेलकडे नोंदवल्या जात आहेत. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभर सायबर गुन्हेगारांचा हैदोस पाहायला मिळत आहे. दुबई आधारित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायबिटला आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हॅकर्सनी सुरक्षा प्रोटोकॉलचा फायदा घेत सुमारे १.५ अब्ज डॉलर्स (१३,००० कोटी रुपये) उडवले आहेत.
यूजर्सना मिळणार रिफंड
बायबिटचे सीईओ आणि संस्थापक बेन बेन झोउ यांनी ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित राहतील असे आश्वासन दिले. प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांना भरपाई देण्यासाठी कंपनीने रिफंड प्रोग्राम देखील सुरू केला आहे. झोउ म्हणाले, बायबिट आमच्या कम्युनिटीचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. या सायबर हल्ल्यात ज्यांचे पैसे गेलेत त्यांची पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल. बिटकॉइन नंतर दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथेरियमची किंमत हॅक झाल्यानंतर सुमारे ४ टक्क्यांनी घसरली आहे. शुक्रवारी त्याची किंमत २,६४१.४१ डॉलर होती.
बायबिट बुडणार नाही : झोउ
सीईओ झोउ म्हणाले की बायबिटकडे ग्राहकांची २० अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. आमचे जगभरात ६ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. चोरीला गेलेला फंड परत मिळाला नसला तरी कंपनी आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याचे आश्वासन त्यांनी गुंतवणूकदारांना दिले. ते म्हणाले, या हॅकमुळे झालेले नुकसान भरून निघाले नसले तरी बायबिट अजूनही सॉल्व्हेंट आहे. वास्तविक, या चोरीनंतर, कंपनी दिवाळखोर अशी भिती बायबिट वापरकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे लोकांनी घाईघाईने पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
२०२२ मध्ये सर्वात मोठी सायबर चोरी
याआधी २०२२ मध्ये सर्वात मोठी सायबर चोरी झाली होती. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या हॅकर ग्रुप लेजारस वर याचा आरोप केला होता. रोनिन नेटवर्कमधून ६२.५ कोटी डॉलरचे क्रिप्टो चलन चोरल्याचा आरोप आहे.