Join us

"कठीण काळात साथ देण्याऐवजी सोडून..," Byju'sच्या संस्थापकांचा गुंतवणूकदारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:08 AM

Byjus Raveendran : संकटात सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच कंपनीच्या आर्थिक अडचणींबाबत माध्यमांशी मोकळेपणानं संवाद साधला. तसंच त्यांनी गुंतवणूकदारांवर टीकाही केली.

Byjus Raveendran : संकटात सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूसचे (Byju's) संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच कंपनीच्या आर्थिक अडचणींबाबत माध्यमांशी मोकळेपणानं संवाद साधला. त्याचबरोबर कठीण काळात कंपनीला साथ देण्याऐवजी कंपनी सोडून गेलेल्या गुंतवणूकदारांवर त्यांनी निशाणा साधला. "काही गुंतवणूकदार बाहेर पडले आहेत, ज्यामुळे कंपनीला आवश्यक निधी उभा करणं कठीण झालंय," असं ते म्हणाले.

"जेव्हा अमेरिकन कर्जदारांनी कंपनीला डिफॉल्ट घोषित केलं आणि डेलावेअर कोर्टात खटला दाखल केला, तेव्हा काही आठवड्यांतच गुंतवणूकदारांच्यावतीनं संचालक मंडळात असलेल्या तीन संचालकांनी राजीनामा दिला. एकाच वेळी संचालक मंडळातील ३ सदस्य सोडून गेल्यानं नव्यानं निधी उभारणं आम्हाला अशक्य होतं आणि आज आम्ही या स्थितीत आहोत," असं बायजू रवींद्रन म्हणाले. या गुंतवणूकदारांच्या बाहेर पडण्यामुळे अडचणीच्या काळात आवश्यक भांडवल उभारण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर कसा परिणाम झाला आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं.

अनेक गुंतवणूकदारांनी, विशेषत: Prosus नं गेल्या चार-पाच वर्षांत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, असंही ते म्हणाले. २०२०-२१ मध्ये जेव्हा कंपनी आक्रमकपणे विस्तार करत होती, तेव्हा गुंतवणूकदारांनी या योजनांना पाठिंबा दिला. सुमारे ४० बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची आमची योजना त्यांनी मान्य केली होती. मात्र, परिस्थिती बिघडल्यानंतर देणी देण्याच्या भीतीनं त्यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचं म्हणत रवींद्रन यांनी निशाणा साधला.

आधी वाढीला पाठींबा दिला

त्यावेळी प्रत्येक गुंतवणूकदाराने आम्हाला आक्रमकपणे विस्तार करण्यास सांगितलं. काहींनी तर आम्हाला एकाच वेळी ४० बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची प्रेरणा दिली. या वाढीचा त्यांना मोठा फायदा झाला. सिकोइया कॅपिटलनं अल्पावधीतच आपल्या ५० दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीवर सुमारे ८ पट परतावा मिळविला. संचालक मंडळातील अनेक गुंतवणूकदारांनी आशियातील इतर कोणत्याही कंपनीपेक्षा आमच्या कंपनीकडून जास्त पैसे कमावल्याचेही ते म्हणाले.

मूल्यांकन शून्य

सध्या बायजू कायदेशीर लढाई लढत असून गुंतवणूकदारांचा विश्वास गमावल्याचं चित्र निर्माण झालंय. रवींद्रन यांनी कबूल केलं की कंपनीनं काही बाजारपेठांमध्ये खूप लवकर प्रवेश केला, ज्यामुळे अनेक चुका झाल्या. "आज बायजूचं मूल्यांकन शून्य आहे. आमचं कर्ज आणि ऑपरेशनल समस्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे," अशी कबुलीही त्यांनी दिली. परिस्थिती कठीण असली तरी कंपनीला रुळावर आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रवींद्रन यांनी सांगितलं.

टॅग्स :व्यवसाय