Byju's Crisis: एडटेक फर्म बायजूसमध्ये (Byju's) सध्या अनेक मोठ्या घडामोडी दिसून येत आहेत. नुकताच ईजीएममध्ये कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांना हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वृत्तावर सीईओ रवींद्रन यांनी दुसऱ्याच दिवशी स्पष्टीकरण दिलं असून आपणच सीईओ आहोत आणि यापुढेही राहणार आहोत, व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाहीत, असं म्हटलं आहे. शुक्रवारच्या ईजीएममध्ये बायजूसच्या गुंतवणूकदारांकडून बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
गुंतवणूकदारांचा मिसमॅनेजमेंटचा आरोप
आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत, तर दुसरीकडे इनव्हेस्टमेंट फर्म प्रोससनेही कंपनीचं मूल्यांकन २२ अब्ज डॉलर्सवरून ५.१ अब्ज डॉलर्सवर आणलं आहे. त्यामुळे कंपनीच्या नेतृत्वावर चुकीच्या कारभाराचा आरोप करून त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या बायजूच्या ईजीएममध्ये, गुंतवणूकदार प्रोसस, जनरल अटलांटिक आणि पीक सारख्या मोठ्या भागधारकांनी कंपनीचे फाऊंडर बायजू रवींद्रन आणि को-फाऊंडर दिव्या गोकुलनाथ आणि त्यांचे भाऊ ऋजु रवींद्रन यांना बोर्डातून हटवण्याचा प्रस्ताव पारित केला. परंतु ईजीएममध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सहभागी झाला नव्हता.
मॅनेजमेंटमध्ये बदल नाहीत
कंपनीतून त्यांची बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या वृत्ताला प्रत्युत्तर म्हणून बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी पुढे येत आपल्या गुंतवणूकदारांना पत्र लिहून एक मोठं विधान केलं. यामध्ये त्यांनी आपण सीईओ असल्याचं सांगत संस्थेमध्ये सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं. कंपनीत सध्या सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी त्यांना सीईओ पदावरून हटवल्याच्या वृत्तावर बायजू रवींद्रन म्हटलं की, 'तुम्ही माध्यमांमध्ये जे वाचलं असेल त्याच्या उलट, आपल्या कंपनीचे सीईओ म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी सीईओपदीच राहीन, व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही आणि बोर्डही तेच राहील. तसंच त्यांनी बायजूसच्या गुंतवणूकदारांच्या ईजीएमवरही टीका करत तो एकप्रकारचा तमाशा असल्याचं म्हटलं.