Byju's News: आर्थिक आणि कायदेशीर अडचणींशी झुंजणाऱ्या एज्युटेक कंपनी बायजूजच्या अडचणी आणखी वाढत आहेत. कर्जदारांच्या एका गटाने न्यायालयात बायजूसच्या काही युनिट्सविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. कंपन्यांकडून कोट्यवधी डॉलर काढून बाहेर पाठवण्यात आल्याचा दावा कर्जदारांनी केलाय. एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्सच्या नेतृत्त्वाखाली कर्जदारांनी न्यूरॉन फ्यूल इंक (Neuron Fuel Inc.), एपिक क्रिएशन्स (Epic! Creations Inc.) आणि टँजिबल प्ले इंक (Tangible Play Inc.) विरुद्ध बुधवारी इलवॉलंटरी चॅप्टर ११ खटले दाखल केले. या तिन्ही कंपन्या पूर्वी बायजूच्या अल्फाच्या मालकीच्या होत्या. अल्फा यावर्षी १२० दशलक्ष डॉलरचे कर्ज बुडवून दिवाळखोर झाली आहे.
काय आहेत लेंडर्सचे आरोप आणि मागण्या
बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी तिन्ही कंपन्यांची आर्थिक स्थिती जाहीर करण्यास नकार देऊन कर्ज करारांचे उल्लंघन केल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे. या कंपन्यांचा खर्च तात्काळ थांबवून त्या चालविण्यासाठी विश्वस्त नेमण्यात यावा, अशी मागणी कर्जदारांनी याचिकेत केलीये. त्यांना आर्थिक दबावाला सामोरं जावे लागत आहे आणि पैसे काढले जात आहेत, जे चिंताजनक आहे, असंही लेंडर्सनं म्हटलंय.
Byju’s नं काय म्हटलं?
या खटल्याला आव्हान देण्याची बायजूची योजना आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, काही कर्जदार कर्जाचे कायदेशीर मालक नाहीत कारण ते 'अपात्र' गुंतवणूकदारांच्या यादीत आहेत, ज्यांना डेट कॉन्ट्रॅक्टअंतर्गत कर्ज होल्ड करण्यास मनाई करण्यात आली आहे. बायजूजचं म्हणणं आहे की, कर्जदार या कंपन्यांचे कर्जदार असल्याचा दावा करीत आहेत, तर कर्जाचे पैसे थकीत आहेत आणि त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बायजूचे प्रवक्ते ज्या प्रकरणात या निर्णयाबद्दल बोलत आहेत, ते प्रकरण १२० दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाशी संबंधित आहे. बायजूस यावर डिफॉल्ट झाली आहे का नाही यावर अद्याप निर्णय येणं बाकी आहे. मार्च २०२३ पर्यंत या सर्व कंपन्या बायजूच्या अल्फाच्या मालकीच्या होत्या आणि त्यानंतर अल्फा ग्लास ट्रस्टच्या ताब्यात आल्या.