अमेरिकेच्या असेट्स मॅनेजमेंट कंपनी बॅरन कॅपिटलनं (Baron Capital ) एडटेक युनिकॉर्न स्टार्टअप बायजूसचं मूल्यांकन जवळपास निम्मं केले आहे. बॅरन कॅपिटलच्या जून तिमाही अहवालानुसार, कंपनीचे ऑडिटर आणि 3 महत्त्वाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या राजीनाम्यानंतर ही नवी व्हॅल्यू ठरवण्यात आलीआहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बायजूसचे व्हॅल्यूएशन 22 अब्ज डॉलर इतके होते. त्यावेळी कंपनीनं कतार गुंतवणूक प्राधिकरणाकडून सुमारे 250 मिलियन डॉलर्सचा निधी उभारला होता. त्या मूल्यांकनाशी तुलना केल्यास, सध्याचं मूल्यांकन सुमारे 44.6 टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचं व्हॅल्यूएशन आता 12 अब्ज डॉलर्सवर आलेय.
कोविडशी संबंधित निर्बंध हटवल्यामुळे कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय घट झाली आहे. कोविडच्या निर्बंधांमुळे ऑनलाइन किंवा डिजिटल शिक्षणात मोठी तेजी दिसून आली होती. याशिवाय, कंपनीचे ऑडिटर डेलॉइटनंही राजीनामा दिला आहे आणि त्यांची जागा दुसऱ्या टॉप 5 ग्लोबल फर्मपैकी एक घेणार असल्याचं बायजूसनं जाहीर केलं. कंपनीच्या 3 बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनंही राजीनामा दिला, ज्यांची नियुक्ती गुंतवणूकदारांनी केली होती. या सर्व घडामोडीनंतर कंपनीचं व्हॅल्युएशन अॅडजस्ट करण्यात आल्याचं बॅरनं कॅपिटलनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
कोरोना काळात तेजीकोरोनाच्या काळात बायजूचा व्यवसाय खूप वेगाने वाढला होता. 2020 च्या दरम्यान, कोरोना महासाथीदरम्यान सर्व काही ठप्प होतं आणि त्या वेळी ऑनलाइन शिक्षणात मोठी भर पडली. मार्च 2020 मध्ये कंपनीचा महसूल 2800 कोटी रुपयांवर पोहोचला. काही कालावधीतच, बायजूस ही भारतातील दुसरी डेकाकॉर्न कंपनी बनली. म्हणजेच कंपनीचं मूल्य 10 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक झाले.पेटीएम ही भारतातील पहिली डेकाकॉर्न कंपनी आहे. बायजूसने व्हाईटहॅटजेआर, आकाश, टॉपर, एपिक आणि ग्रेट लर्निंग सारख्या स्टार्टअप्ससह अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. हे अधिग्रहण देखील कंपनीनं अतिशय उच्च मूल्यांकनावर केलं होतं, परंतु नंतर या सर्वांमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे.
पालकांच्या तक्रारीकाही पालकांनी सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास सुरुवात केल्यानं बायजूसच्या समस्या वाढू लागल्या. बायजूसमुळे मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे कंपनीचं वर्क कल्चरही खराब असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं. अशक्य असणारी टार्गेट्स त्यांना देण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. 2020 मध्ये कंपनीमध्ये सुमारे 14 हजार कर्मचारी होते, ज्यांची संख्या 2022 पर्यंत 58 हजारांपर्यंत गेली. मात्र, त्यानंतर कंपनीत कपातीचा असा टप्पा सुरू झाला की आजमितीस कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 25 हजारांच्या जवळपास आहे. काही गोष्टी इतक्या वाईट झाल्या की 1.2 अब्ज डॉलर्सच्या टर्म लोनबाबत कंपनीनं रेडवूडच्या नेतृत्वाखालील लेंडर्सविरोधात न्यूयॉर्क सुप्रिम कोर्टात खटला दाखल केला. अनेक गोष्टींता कंपनीच्या प्रतिमेवरही परिणाम झालाय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज कंपनीचं मूल्यांकन निम्म्यावर आलंय.