ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप बायजूस (BYJU'S) आपल्या 2,500 कर्मचार्यांची कपात करणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. नफा कमावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, असे त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.
आर्थिक कारणांमुळे आपल्याला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे, जेणेकरून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करता यावे असे बायजू रविंद्रन यांनी सांगितले. ज्यांना बायजूस सोडून जावं लागेल अशा कर्मचाऱ्यांबाबत मला वाईट वाटत आहे. तुम्ही माझ्यासाठी केवळ एक नाव नाही किंवा तुम्ही कोणी संख्या नाही, तुम्ही कंपनीचे केवळ ५ टक्क्यांपैकीही नाही, तुम्ही माझ्या जीवनातील पाच टक्के लोक आहात, असेही त्यांनी म्हटले.
या आर्थिक वर्षात नफा कमावण्याच्या दिशेने कठोर मेहनत करत आहोत. तेजीने वाढणाऱ्या ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक ग्रोथने काही गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांना ओळखून त्या दुरुस्त करण्याची गरज आहे. असे करण्यासाठी कंपनी आपल्या संघटनेतील पाच टक्के कर्मचाऱ्यांची म्हणजेच २५०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. नफ्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी त्याची मोठी किंमत मोजावी लागते. ज्यांना बायजूस सोडावं लागेल त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत आहे. या कपातीबाबत मी तुमची माफी मागतो, असंही रविंद्रन म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनी आपल्या २५०० कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे बायजूसने म्हटले होते. भारतात स्टार्टअप कंपन्या प्रामुख्यानं एड्युटेक कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. कंपनीने यापूर्वी जून महिन्यात ११०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले होते.