Join us

कधीकाळी देशातील सर्वात मोठे स्टार्टअप; आता रस्त्यावर आली Byju’s, असा आहे प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:11 PM

एकेकाळी एक अब्ज डॉलर्सची कंपनी, आज कर्मचाऱ्यांची पगार देण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ.

Byju's Downfall : नरेंद्र मोदींचे सरकार 2014 साली आले अन् भारतामध्ये 'स्टार्टअप'ची झपाट्याने वाढ झाली. या स्टार्टअपमध्ये Byjus हा सर्वात तेजस्वी तारा बनला. देशातील एज्युटेक सेगमेंटमधील ती पहिली युनिकॉर्न कंपनी होती. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी, ज्याचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे. कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळाले, परंतु आता कंपनी डबघाईला आली आहे. कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स गहाण ठेवावे लागत आहेत. एकेकाळी नंबर वन असणाऱ्या कंपनीची अशी अवस्था कशी झाली, जाणून घ्या...

बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न 2011 मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ, यांनी सुरू केली होती. याआधी ते मुलांना कोचिंग द्यायचे. ही कंपनी ऑनलाइन व्हिडिओ आधारित शिक्षणावर भर देत असे. 2015 मध्ये देशातील 'स्टार्टअप बूम' दरम्यान, या कंपनीने एक अॅप विकसित केले, जे आज आपण सर्वजण Byju's नावाने ओळखतो. 2018 पर्यंत ही कंपनी देशातील पहिली एज्युटेक युनिकॉर्न बनली होती. कोविडच्या काळात Byju's ने या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. या काळात Byju's चा विस्तार वेगाने झाला, पण कोविड संपल्यानंतर शाळा सुरू होताच कंपनीची परिस्थिती बदलली.

अनेक कंपन्या मिळवल्याबायजूकडे स्वत:चे फारसे फंड्स नव्हते आणि ते इतर स्टार्टअप्सप्रमाणे व्हेंचर फंडिंगवर अवलंबून होते. कोविडच्या वाढीमुळे कंपनीला अतिआत्मविश्वास आला आणि त्यांनी एकामागून एक अनेक अधिग्रहण केले. यामध्ये $300 मिलियनच्या 'व्हाईटहॅट ज्युनियर' डीलची बरीच चर्चा झाली. यानंतर त्यांनी 'आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस' मिळवली. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस हे भारतातील सर्वोत्तम PMT आणि IIT प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. Byju ने 2021 मध्ये $950 मिलियन मध्ये ही संस्था विकत घेतली. यानंतर बायजूच्या अडचणी सुरू झाल्या. 

नोव्हेंबर 2021 मध्ये बायजूने विदेशी बाजारातून $1.2 अब्ज कर्ज उभारले. कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचे निकाल जाहीर केले, त्यात कंपनीचा तोटा 18 पटीने वाढून 4,588 कोटी रुपये झाला. मे 2023 मध्ये Byju ने डेव्हिडसन केम्पनर सोबत 2000 कोटी रुपयांचा निधी गोळा केला. यानंतर जून 2023 मध्ये बायजू परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाले.

वादांमुळे जगणे कठीण झालेयानंतर अनेक मोठे गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले. कंपनी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला. बायजूमध्ये नोकरकपात सुरू झाली. या सगळ्याने बायजूचे कंबरडे मोडले. त्यांना मीडियामध्येही अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. यानंतर अलीकडेच कंपनीला ईडीकडून चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परकीय चलन व्यवहारातील सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगबाबत ही चौकशी सुरू आहे. आता बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या मूळ कंपनीतील कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवावी लागली आहे. त्यांनी आपले सर्व शेअर्सही गहाण ठेवले आहेत. 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकपैसाशेअर बाजारशेअर बाजार