Byju's in trouble: गेल्या अनेक दिवसांपासून संकटात अडकलेल्या Byju's ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या कंपनीने देशभरातील सर्व ऑफीस रिकामी केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीजची मुदत संपल्यामुळे कंपनीने आपले ऑफीस रिकामे केले आहेत. कंपनीने फक्त बंगळुरुमधील मुख्यालय कायम ठेवले आहे.
दरम्यान, 20 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारीच्या प्रलंबित पगाराचा काही भाग बायजूने दिला आहे. कंपनीचे प्रमुख बायजू यांनी रविवारी ही माहिती दिली. नुकत्याच बंद झालेल्या राइट्स इश्यूमधून उभारलेला निधी वापरण्याची परवानगी मिळाल्यावर कंपनीने उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने म्हटले की, "राइट इश्यू फंड उपलब्ध झाल्यानंतर कंपनी उर्वरित रक्कम देईल. तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी आम्ही पर्यायी निधीची व्यवस्था केली आहे."
खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जाते
कंपनीने खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना पूर्ण पैसे दिले. तर मध्यम ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पगाराचा काही भाग दिला जातो. कंपनीने सांगितले की, वीकेंड आणि दुसरा शनिवार, यांमुळे 11 मार्चला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.