संरक्षण मंत्रालयाने ‘सी-295’ या 56 मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास 22000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षणावरील कॅबिनेट कमिटीने यासाठी नुकताच हिरवा झेंडा दाखविला होता. महत्त्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनवण्यात येणार असून टाटा अॅडव्हान्स सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहे. राफेलनंतर ही दुसरी मोठी डील आहे जी भारतीय कंपनीसोबत मिळून केली जाणार आहे. (Govt seals mega deal with Airbus for purchase of 56 C-295 military transport aircraft. ) दरम्यान, यानंतर टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला. तसंच त्यांनी दोन्ही व्हेन्चर्सचं अभिनंदन केलं.
"C-295 ही विमानं तयार करण्यासाठी टाटा अॅडव्हान्स सिस्टम आणि एअरबस डिफेन्सच्या जॉईंट व्हेन्चर्सच्या प्रोजेक्टला क्लिअरन्स मिळणं हे मोठं पाऊल आहे. यामुळे भारतात एव्हिएशन आणि एव्हिएशनशी निगडीत प्रकल्पांचे दरवाजे उघडतील. C-295 हे विमान मल्टिरोल विमान असेल, जे मोहिमेच्या आवश्यकतेनुसार अनेक डिव्हाईस आणि अत्यावश्यक गोष्टींसह असेल. ही मंजुरी भारतात पूर्णपणे विमान निर्मितीला प्रतिबिंबित करते," असं रतन टाटा म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
या डीलनुसार 16 विमाने एअरबस डिफेन्स स्पेनवरून आयात केले जाणार आहेत. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या आसपास जागा शोधण्यात येत आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्येदेखील प्रकल्प उभा करता येऊ शकतो. देशात 2012 पासून C295MW ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टच्या दिशेने काम सुरु आहे. यंदा त्याचा प्रस्ताव सीसीएसकडे पाठविण्यात आला होता.