नवी दिल्लीः केंद्र सरकारनं शेतकरी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. एकीकडे सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये मिळवण्यासाठी खात्याला आधार लिंक करण्याची तारीख वाढवलेली आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवलेला आहे. मोदी सरकारनं पाच महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 'डीए' पाच टक्क्यांनी वाढवला!
मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याआधी महागाई भत्त्यात केवळ 2 ते 3 टक्क्यांनी वाढ व्हायची. मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवल्याचं जावडेकर म्हणाले. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 12 टक्के महागाई भत्ता मिळवतो. आता तो 17 टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आल्यानं सरकारी तिजोरीवर 16 हजार कोटींचा भार पडेल. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा लाभ सध्या सेवेत असलेल्या 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती घेतलेल्या 65 लाख कर्मचाऱ्यांना होईल, असं जावडेकर म्हणाले. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे.
POKहून विस्थापित झालेल्या 5300 कुटुंबीयांना मिळणार 5.5 लाख रुपये
मोदी सरकारनं पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. सरकारनं 5300 कुटुंबीयांना 5.5 लाख रुपये मदतनिधी देण्याचं जाहीर केलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की, यामुळे विस्थापित कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील 5300 विस्थापित कुटुंब जम्मू-काश्मीरशिवाय इतर क्षेत्रात वास्तव्याला आलेले आहेत. अशा कुटुंबीयांना मोदी सरकार 5.5 लाख रुपये मदतीच्या स्वरूपात देणार आहे.
Cabinet approves Inclusion of 5,300 DP families of Jammu & Kashmir-1947 who initially opted to move outside the State of Jammu & Kashmir but later on returned and settled in the State of Jammu & Kashmir.#CabinetDecisions
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
Details here: https://t.co/R3cr8qdmrB
आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट मानधन
केंद्र सरकारनं आशा कार्यकर्त्यांना गुड न्यूज दिली आहे. आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात केंद्रानं दुप्पट वाढ केली आहे. पहिल्यांदा त्यांना हजार रुपये मानधन मिळत होतं, त्याऐवजी आता त्यांना 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आशा कार्यकर्त्या या प्रामुख्यानं महिला असतात, त्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची सुविधा पुरवितात. हा भत्ता जुलै 2019पासून लागू झाला असून, लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
किसान सन्मान निधीसाठी आधार नंबर देण्याच्या मुदतीत वाढ
जावडेकरांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितलं की, शेतकरी 30 नोव्हेंबरपर्यंत किसान सन्मान निधीसाठी आधार नंबर देऊ शकतात. पहिल्यांदा ही तारीख ऑगस्ट 2019 होती. या निधीअंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.
रेडिओ अन् टेलिव्हिजन क्षेत्रात भारत अन् परदेशी प्रसारकांमध्ये सामंजस्य कराराला मंजुरी#Cabinet approves MoUs signed between India and Foreign Broadcasters in the field of Radio and Television.
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
Details here: https://t.co/hPQNauMY8a#CabinetDecisions
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारकांमध्ये सामंजस्य कराराला मंजुरी दिलेली आहे. या कराराला मंजुरी दिल्यामुळे परदेशी प्रसारकांबरोबरच्या सामंजस्यानं एक नवीन दृष्टिकोन, नवं तंत्रज्ञान आणि टेलिव्हिजन क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेत प्रेक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची रणनीती, उदारीकरण आणि जागतिकीकरणात मदत मिळणार आहे. परस्पर देवाण-घेवाण, सह-उत्पादकाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीवर करण्यात येणार आहे.